महाराष्ट्राचा दादा हरपला - लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भावुक प्रतिक्रिया

महाराष्ट्राचा दादा हरपला - लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भावुक प्रतिक्रिया 


महाराष्ट्राचे महत्वाचे नेते राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज सकाळी विमान अपघाताने निधन झाले आणि हे वृत्त कळताच मनाला खूप दुःख झाले. अजितदादांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. आकस्मिक असं संकट महाराष्ट्रावर आले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच दोन तास मी स्तब्धच होतो, काय बोलावे सुचतच नाही.  जनसामान्यांच्या बाबतीत अतिशय जिव्हाळा, प्रेम आपुलकी आणि तितक्याच तडफेने काम करणारे असे ते होते. त्यामुळे प्रत्येकाला वाटते कि आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती हरपला आहे. अजितदादा यांची माझी जास्त वेळ भेटी झाल्या नसल्या तरी जेवढ्या भेटी झाल्यात त्यामध्ये आम्ही एकमेकांच्या मनातील बोलत होतो त्यामुळे त्यांचे आणि माझे जिव्हाळ्याचे नाते होते. काही महिन्यापूर्वी ईश्वरपूर येथे एका कार्यक्रमात भेट झाली होती. व्यासपीठावर आमच्यामध्ये दोन चार मिनिटे चर्चा झाली. त्या कार्यक्रमात त्यांनी बोलताना १२ कोटी जनतेचा उल्लेख करत आणि मला कल्पना नसलेले माझ्या विषयी ते कौतुकाने जाहीरपणे भरभरून बोलले. सर्वसामान्यांची कदर आणि ओळख असलेला हा नेता. सामान्य माणसाची कदर ओळखणारे, खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे ठामपणे सांगणारे असे नेतृत्व महाराष्ट्राने गमावल्याची आणि महाराष्ट्राचा दादा हरपल्याची भावुक प्रतिक्रिया लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केली. 

अजितदादांची कार्य अजोड - आमदार प्रशांत ठाकूर 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ओळख कर्तव्यदक्ष आणि धडाडीचे नेते अशी होती. विमान अपघातात त्यांचे निधन झाले आणि त्यांच्या निधनाची बातमी सर्वांसाठी धक्कादायक पद्धतीचे वृत्त आहे. अजितदादांनी सदैव धडपडणाऱ्या, काम करणाऱ्या माणसाला आधार दिला आहे. विशेषत्वाने रायगड जिल्ह्यावर त्यांचे प्रेम होते. रायगड जिल्ह्यातील अनेक विकासकामांना त्यांनी पाठबळ दिले. ते पाहता संपूर्ण जिल्ह्यातला प्रत्येक राजकीय व सामाजिक कार्यकर्ता आज हळहळत आहे. अजितदादांच्या निधनाचे आज हे वृत्त ऐकल्यानंतर अनेकांना शोक अनावर झाला आहे. त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला दुःख झाला आहे आणि यातून त्यांना सावरणे कठीण आहे. अजितदादांनी केलेले कार्य अजोड आहे. रायगड जिल्हा भाजपच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.