सुहित जीवन ट्रस्टच्या तीन विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड

सुहित जीवन ट्रस्टच्या तीन विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड

पनवेल (प्रतिनिधी) स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय ॲथलेटिक्स स्पर्धा नागपूर येथील रामटेक येथे नुकत्याच उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील विविध संस्थांमधून एकूण ३२० विशेष खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतून सुहित जीवन ट्रस्टच्या तीन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली असून संस्थेतील या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट यशाबद्दल तसेच त्यांनी केवळ संस्थेचेच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्याचे नाव उंचावल्यामुळे समाजातील विविध स्तरांतून व समस्त महाराष्ट्रातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

 या स्पर्धेत सुहित जीवन ट्रस्ट, पेण (जि. रायगड) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. १८ वर्षांवरील वयोगटात कु. मनीष गणेश म्हात्रे याने २०० मीटर धावणे प्रकारात सुवर्णपदक पटकावले. १४ ते १८ वयोगटात कु. अर्जुन पांडुरंग वारे याने २०० मीटर धावणे प्रकारात रौप्यपदक मिळवले, तर ६ ते १२ वयोगटात कु. सिद्धीका मंदार पाटील हिने ५० मीटर धावणे प्रकारात सुवर्णपदक जिंकले.या घवघवीत यशामुळे या तिन्ही विद्यार्थ्यांची शुक्रवार, दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी हरियाणा येथील महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून त्यांच्या यशामागे पालक, संस्था व शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे.