राष्ट्र सर्वोपरि भाव जागवणारे राष्ट्र सेविका समितीचे सघोष संचलन पनवेलमध्ये संपन्न
पनवेल (प्रतिनिधी) भारतीय संस्कृती बाबत अभिमान जागृती, राष्ट्र सवोॅपरी हे ब्रीद घेऊन आणि सुखमय सुसंघटित समाज निर्मिती चे उद्दिष्ट समोर ठेऊन गेली ९ दशके राष्ट्र सेविका समिती कार्यरत आहे. याच उद्दिष्टाचा एक भाग म्हणजे संघटितपणे शिस्तबद्ध पद्धतीने केलेले सघोष संचलन. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित केले जाणारे संचलन यावर्षी रायगड जिल्ह्यात पनवेल येथे आयोजित करण्यात आले होते.
नूतन गुजराथी विद्यालयाच्या प्रांगणात सुरुवात करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा - विसावा हॉटेल- ज्योती आहार भवन- हनुमान मंदिर- सीकेपी हॉल- विरुपाक्ष मंदिर- कर्मवीर भाऊराव पाटील स्मारक- वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह- शिवाजी महाराज स्मारक या मार्गाने हे संचलन गुजराथी शाळेमधे संपन्न झाले. यामध्ये पेण, पनवेल, खालापूर आणि उरण या चार तालुक्यांचा सहभाग होता. एकूण १७९ सेविका आणि जवळपास १०० नागरिक, संघ बंधू यांनी देखील या संचलनाला हजेरी लावली. कोकण प्रांत व्यवस्था प्रमुख कांचन ताई पंडित उपस्थित होत्या तर रायगड जिल्हा पालक मंजूषा ताई शेंडे, जिल्हा व्यवस्था प्रमुख मंजुषा भावे, जिल्हा सह-व्यवस्था प्रमुख विजया औंधेकर, जिल्हा पर्यावरण गतिविधी प्रमुख ज्योती कानिटकर हा अधिकारी वर्ग ही उपस्थित होता.
नेत्रतज्ञ संगीताताई जोशी यांना प्रमुख अतिथी म्हणुन आमंत्रित केले होते. त्यांनी संचलना ला शुभेच्छा दिल्या. कांचनताई पंडित यांनी त्यांच्या उद्बोधनात राष्ट्रसेविका समितीच्या 90 वर्षाच्या वाटचालीचा उल्लेख करून कोकण प्रांतातील शाखांच्या प्रगतीची माहिती दिली. राष्ट्र सेविका समिती हे देशातील महिलांचे सर्वात मोठे व सर्वात जुने संघटन असून आपण राष्ट्र निर्मितीसाठी समाजातील चुकीच्या पद्धती दुरुस्त करून आपल्या आचरणातून नवा आदर्श समाज समोर ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. राष्ट्र सर्वोपरी हा भाव सर्व कुटुंबांमध्ये जागृत होणे आवश्यक आहे आणि ज्या प्रमाणे शरीर विविध अवयवांना एकत्र घेऊन काम करते त्याप्रमाणे समितीने सर्व समाज घटकांना एकत्र घेउन काम करायचे आहे. असे आपल्या उद्बोधनात त्यांनी नमूद केले. संपूर्ण वंदे मातरम संचलनाची सांगता झाली.

