डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित
बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
केदार भगत यांच्याकडून मुलांना खेळणी व खाऊचे वाटप
पनवेल/प्रतिनिधी-नवीन पनवेल येथील डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या परिसराची आकर्षक सजावट, रांगोळ्या आणि विविध उपक्रमांनी संपूर्ण वातावरण रंगतदार झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सौ. श्रेया जाधव व विद्यार्थ्यांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून पंडित नेहरू यांच्याविषयी माहिती दाखवण्यात आली. शिक्षकांनी बालदिनाचे महत्त्व समजावून सांगितले. पूर्व व्यावसायिक गटातील विद्यार्थ्यांनी भाषण केले, तर पूर्व प्राथमिक गटातील मुलांनी गीत सादर केले. थेरपी वर्गातील विद्यार्थ्याने ‘चाचा नेहरू’ ची वेशभूषा करून आकर्षण ठरला.
बालदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल शहर उपाध्यक्ष केदार सुरेश भगत व त्यांचे सहकारी विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा करण्यासाठी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. श्री. भगत यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा देत शाळेसाठी पुढील काळात मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खेळणी आणि खाऊ (पॉपकॉर्न व आईस्क्रीम) वाटप करण्यात आले.
शेवटी मुख्याध्यापिका सौ. श्रेया जाधव यांनी मान्यवरांचे आभार मानले. संपूर्ण दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंद, उत्साह आणि मौजमजेने भरलेला ठरला. बालदिनाचा उत्सव शाळेत संस्मरणीय पद्धतीने पार पडला.

