मराठी भाषा सप्ताह साजरा – पुरंदर स्नेह ग्रंथ संग्रहालयाचा उपक्रम

 -

मराठी भाषा सप्ताह साजरा – पुरंदर स्नेह ग्रंथ संग्रहालयाचा उपक्रम



खारघर/प्रतिनिधी,९ ऑक्टोबर :

महाराष्ट्र शासनाने आणि शिक्षण विभागाने विविध शाळा व महाविद्यालयांना ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत “मराठी भाषा आठवडा” साजरा करण्याचे आवाहन केले आहे.हा आठवडा मराठी भाषेचे संवर्धन, प्रसार आणि अभिमान जागवण्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो.

         मराठी भाषेचा सन्मान वाढवणे, वाचन-लेखन आणि बोलण्याची सवय विकसित करणे, तसेच मराठी साहित्य, संस्कृती, नाट्य, कविता आणि इतिहास यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देणे हे या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट आहे.मराठी ही प्रशासनाची आणि ज्ञानाची भाषा बनावी यासाठी शासनाने शाळा, महाविद्यालये व ग्रंथालयांना विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.याच उद्देशाने पुरंदर स्नेह ग्रंथ संग्रहालय, खारघर सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय यांच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने ८ ऑक्टोबर रोजी “वाचन प्रेरणा दिवस” साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम खारघरमधील गोखले शाळा व एस क्लासेस येथे उत्साहात पार पडला.

         कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दीपक शिंदे म्हणाले, “मराठी ही केवळ भाषा नाही, तर संस्कृती, भावना आणि अस्मितेचा श्वास आहे.मराठी भाषा आठवडा हा आपल्या मातृभाषेबद्दल प्रेम, अभिमान आणि जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.”या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी पुरंदर स्नेह ग्रंथ संग्रहालयाचे आभार मानले.

          या प्रसंगी संग्रहालयाच्या ग्रंथपाल वर्षा शिरसकर, सहाय्यक ग्रंथपाल सिद्धी गुजर, गोखले शाळेच्या शिक्षिका गौरी शिंदे, वर्षा रोकडे आणि एस क्लासेसचे दीपक शिंदे उपस्थित होते.