मा.पंतप्रधान महोदयांच्या शुभहस्ते अनावरण झालेल्या ‘मुंबई वन ॲप’सुविधेमध्ये एनएमएमटीच्या प्रवासाचाही समावेश

 मा.पंतप्रधान महोदयांच्या शुभहस्ते अनावरण झालेल्या ‘मुंबई वन ॲप’सुविधेमध्ये एनएमएमटीच्या प्रवासाचाही समावेश



            नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते ‘मुंबई वन ॲप (वन ॲप – लिमिटलेस जर्नीज्)’  या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ॲपचे अनावरण झाले असून यातून शहर गतीशीलतेला नवा आयाम लाभला आहे.

            *मुंबई महानगर प्रदेशात असलेल्या 11 सार्वजनिक वाहतूक ऑपरेटर्सचा समावेश असणारा हा देशातील पहिला संयुक्त मॉबिलिटी प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक प्रवासी वाहतुक परिवहन उपक्रमाचाही सहभाग असून आता एनएमएमटीचे तिकीट प्रवाशांना या संयुक्त ऑनलाइन ॲपद्वारे काढता येणार आहे.*

            महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री ना.श्री एकनाथ शिंदे  व उपमुख्यमंत्री ना.श्री. अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र राज्य हे भारत देशातील स्मार्ट, जलद आणि अधिक शाश्वत शहरांच्या परिवर्तनाचे नेतृत्व करीत आहे.

            त्याचाच एक भाग म्हणून स्थानिक ट्रेनपासून ते महानगरांपर्यंत, बसेसपासून ते मोनोरेलपर्यंत, प्रवासी आता फक्त ‘मुंबई वन’ या एकाच अॅपचा वापर करून नियोजन, आरक्षण आणि प्रवास करू शकतात.

            पंतप्रधान महोदयांच्या डिजिटल इंडियाच्या स्वप्नाची आणि एमएमआरडीएच्या #MumbaiInMinutes या ध्येयाची पूर्तता करण्यासाठी ‘मुंबई वन अॅप’ हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.  याव्दारे वाहतुकीच्या अनेक सेवा एकत्रित करून प्रवासाचा वेळ कमी होणार आहे, सुलभता वाढणार आहे तसेच लाखो लोकांचे जीवनमान सर्वार्थाने सुलभ होणार आहे.

             या ॲपमध्ये एनएमएमटीच्या प्रवासी सेवेचाही समावेश असल्याने नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी आनंद व्यक्त करीत या ॲपचा प्रत्येकाने जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन केले आहे.