अनिल राय संपादित स्टार पनवेल दिवाळी अंकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते भव्य प्रकाशन
पनवेल/प्रतिनिधी,दि.१८- गेल्या दहा वर्षांपासून पनवेल शहरातून नियमितपणे प्रकाशित होणारे लोकप्रिय साप्ताहिक ‘स्टार पनवेल’यावर्षीच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन शनिवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी रायगडचे माजी खासदार आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ संपादक विजय कडू, अकबर सय्यद, केवल महाडिक, पत्रकार संजय कदम, आनंद पवार, धनश्री रेवडेकर, विशाल सावंत, राज भंडारी, चंद्रकांत शिर्के, सनीप कलोते, दिपाली पारसकर, शंकर वायदंडे, गौरव जहांगीरदार, संजय गुप्ता, तसेच ‘स्टार पनवेल’चे संपादक अनिल राय, त्यांचे सुपुत्र आशिष राय आणि सौ. आरती आशिष राय आदी मान्यवर उपस्थित होते.
स्टार पनवेल दिवाळी विशेषांकाचे या वर्षीचे मुखपृष्ठ चर्चेचा विषय ठरले आहे. मुखपृष्ठावर पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक वेशभूषेत दिवा हातात धरलेली महिला दिसते. ही महिला म्हणजेच पत्रकार अनिल राय यांच्या सुनबाई, ज्यांनी स्वतः हा सुंदर छायाचित्र साकारला आहे. त्यांच्या या सृजनशीलतेला उपस्थित मान्यवरांनी मनापासून दाद दिली. स्टार पनवेल हे वृत्तपत्र गेली अनेक वर्षे स्थानिक घडामोडी,सामाजिक प्रश्न, तसेच नागरिकांच्या हिताच्या बातम्या प्रभावीपणे मांडत आले आहे. पत्रकार अनिल राय यांनी पत्रकारितेतील पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि समाजाशी असलेली बांधिलकी यावर नेहमी भर दिला आहे. गेली १५ वर्षे ते सतत आणि निष्ठेने पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या या सातत्यपूर्ण योगदानामुळे ‘स्टार पनवेल’ने पनवेल व रायगड जिल्ह्यात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
यावेळी रामशेठ ठाकूर यांनी ‘स्टार पनवेल’च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत म्हटले की,स्थानिक पत्रकार हे समाजाचे आरसे असतात.अनिल राय आणि त्यांची टीम ही जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पाडत आहे.”दिवाळीच्या शुभप्रसंगी प्रकाशित झालेला हा विशेषांक केवळ एक अंक नसून, तो स्थानिक पत्रकारितेच्या समर्पणाचा आणि संस्कृतीप्रेमाचा एक सुंदर नमुना ठरला आहे.
