लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ‘दैनिक किल्ले रायगड’च्या ५९ व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन
पनवेल (प्रतिनिधी) ज्येष्ठ पत्रकार प्रमोद वालेकर संपादित दैनिक किल्ले रायगडच्या ५९ व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आज संपन्न झाले. या प्रसंगी त्यांच्यासोबत सहसंपादक प्रदीप वालेकर, व्यवस्थापक तुषार तटकरी, सा. रायगड प्रभातचे संपादक विजय पवार, प्रसिद्धी प्रमुख हरेश साठे, पत्रकार उमेश भोईर, आदी उपस्थित होते.
या प्रसंगी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दैनिक किल्ले रायगडचा दिवाळी विशेषांक दरवर्षी वजनदार लेखकांच्या लेखणीतून साकारत असल्याचे अधोरेखित केले. यंदाचाही अंक परिपूर्ण व दर्जेदार झाल्याची पावती त्यांनी किल्ले रायगडच्या टीमला दिली.दर्जेदार साहित्यातूनच उत्कृष्ट अंकांची निर्मिती होत असते. त्या परंपरेला वृद्धिंगत आणि टिकवून ठेवण्यासाठी किल्ले रायगडच्या संपादकीय टीमने घेतलेली अपार मेहनत या अंकातून स्पष्ट जाणवते, असे मत लोकनेते ठाकूर यांनी व्यक्त केले. स्वर्गीय ल. पा. वालेकर हे पत्रकारिता क्षेत्रातील आधारस्तंभ होते, त्यांचा वारसा पुढे चालविण्याचे काम त्यांचे कुटुंबीय करीत आहेत असे सांगतानाच किल्ले रायगड साहित्यिकांची परंपरा महाराष्ट्रभर मांडण्याचे काम करीत असल्याचे गौरवोदगारही त्यांनी यावेळी काढले.
या विशेषांकामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि समकालीन विषयांवर विविध मान्यवर लेखकांचे लेख प्रकाशित करण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणेच यंदाचा अंकही वाचकांना विचारप्रवृत्त, प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक ठरणार आहे, असा विश्वास किल्ले रायगडचे संपादक प्रमोद वालेकर यांनी व्यक्त केला.