महेंद्रशेठ घरत यांनी प्रेषितला दिली लॅपटॉपरूपी दृष्टी!दिव्यांगांना साथ देणे हे कर्तव्य : महेंद्रशेठ घरत
उरण दि १४(विठ्ठल ममताबादे )काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचा दातृत्वाचा महिमा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. 'कैलास मानसरोवर' यात्रेच्या निमित्ताने नुकतेच त्यांनी नेपाळमधील एका दाम्पत्याला घर बांधून देऊन त्याची साक्ष दिली आहे. दिव्यांगांसाठी तर ते कायमच पाठीराखे आहेत.
प्रेषित विनिता बर्फे हा विद्यार्थी उलवे नोडमध्ये राहत असून नववीमध्ये शिकत आहे. तो १०० टक्के दृष्टिहीन आहे. त्याला पुढील शिक्षण सुकर व्हावे, म्हणून विनिता बर्फे यांनी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्याकडे ब्रेल लिपीतील लॅपटॉपची मागणी केली होती. महेंद्रशेठ घरत आणि सौ. शुभांगीताई घरत यांनी क्षणाचाही विलंब न लावता प्रेषितला नुकताच अत्याधुनिक असा ब्रेललिपीतील लॅपटॉप भेट म्हणून दिला. त्यामुळे त्याचे आता शिक्षण अधिक सुकर होणार आहे. त्यामुळे महेंद्रशेठ घरत दाम्पत्य दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरले आहेत.
यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, "गरजवंताला मदत करणे हे माझ्या नसानसांत भिनले आहे. विशेषतः दिव्यांगांबाबत मी अधिक सकारात्मक विचार करतो. कारण दिव्यांगांचे पालनपोषण करताना पालकांची ससेहोलपट होते. दिव्यांगाच्या जन्मापासूनच त्याच्या आई-वडिलांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते, तरीही ते हार मानत नाहीत. प्रेषित हा गरजू आणि होतकरू विद्यार्थी आहे. तो शंभर ट्क्के दृष्टिहीन आहे. त्यामुळे त्याची शिक्षणातील अडचण मी समजून घेऊन त्याला आता ब्रेललिपीतील लॅपटॉपरूपी दृष्टी दिली आहे. मी माझे कर्तव्य केले आहे. यापूर्वीही मी अनेक दिव्यांगांना सहकार्य केले आहे."
यावेळी लहानपणापासून दृष्टिहीन असलेला प्रेषित म्हणाला, "माझ्या शिक्षणातील अडचण महेंद्रशेठ घरत साहेब यांनी तातडीने सोडविली आहे. त्यांनी मला शब्द दिला होता; परंतु आज त्यांनी तो पूर्ण करून दाखवला. हे उपकार मी कधीही विसरणार नाही. महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई यांचा मी कायमचाच ऋणी राहीन. त्यांचे मनापासून आभार."