नेदरलँड्स शिष्टमंडळाची नवी मुंबई महानगरपालिकेस अभ्यासभेट*

 नेदरलँड्स शिष्टमंडळाची नवी मुंबई महानगरपालिकेस अभ्यासभेट*

 





                    नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेदरलॅंड किंगडमच्या कॉन्सुलेट जनरल यांच्या नेतृत्वाखाली जल व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन या विषयांवर उच्चस्तरीय  संवादाचे आयोजन नेदरलँडच्या शिष्टमंडळासोबत महापालिका मुख्यालयात संपन्न झाले. यामध्ये महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची नेदरलँडचे कॉन्सुलेट जनरलचे मिशन उपप्रमुख श्री थिअरी व्हॅन हेल्डन आणि त्यांच्या समवेत शिष्टमंडळात सहभागी प्रतिनिधींची शाश्वत शहरी पायाभूत सुविधा, कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती, वर्तुळाकार अर्थव्यवस्था आणि जल व्यवस्थापनात सहकार्याच्या संधी अशा विविध विषयांवर सांगोपांग चर्चा झाली.

               याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे व इतर अधिकारी उपस्थित होते.

               यावेळी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नवी मुंबई शहरातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची माहिती शिष्टमंडळाला सादरिकरणाव्दारे देत भारतातील सर्वात नियोजित, शाश्वत सुविधायुक्त व भविष्यकालीन आशादायी शहर म्हणून नवी मुंबई नावारुपाला येत असल्याचे विविध उपक्रम, प्रकल्प यांची माहिती देत सांगितले.

               नेदरलँड्सच्या कॉन्सुलेट जनरलचे मिशन उपप्रमुख श्री. थियरी व्हॅन हेल्डन यांनी नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक शहरी सुविधांविषयी दोन्ही प्रदेशांच्या सामायिक दृष्टिकोनाची रूपरेषा मांडली. नेदरलँड्स वॉटर पार्टनरशीपच्या प्रकल्प व्यवस्थापक सुश्री मिरीयम व्हॅन बुकेम यांनी जलव्यवस्थापनाविषयी अत्याधुनिक प्रणालीची माहिती दिली व सत्राचे संचालन केले. नेदरलँड एन्टरप्राईजेसच्या सल्लागार सुश्री जॅकलीन एकार्ड जेरिससन यांनी घनकचरा व्यवस्थापनातील महिलांचा सहभाग याविषयी माहिती दिली. त्यानंतर जलप्रक्रिया, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि शहरी नवउपक्रम यासारख्या क्षेत्रांमध्ये काम करणा-या डच कंपन्यांकडून तपशीलवार तंत्रज्ञानविषयक सादरीकरण करण्यात आले.

               सादरीकरणानंतर परस्पर संवादात नमुंमपाच्या विविध प्रकल्प आणि उपक्रमांमध्ये डच तंत्रज्ञानाचा उपयोग करणेविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. आयुक्त महोदयांनी नवी मुंबईचे एकात्मिक व्यवस्थापनावर भर असल्याचे सांगत पाणी पुरवठा, घनकचरा आणि ऊर्जा यांच्या बद्दल माहिती देत नेदरलँड्सच्या प्रतिनिधी मंडळाला भारतासाठी स्केलेबल आणि प्रतिकृतीयोग्य शहरी मॉडेल्सची सह-निर्मिती करण्यासाठी आवाहन केले. डच प्रतिनिधींनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्प व कामकाजाचे कौतुक करीत नेदरलँड्सच्या तांत्रिक कौशल्याची जोड नवी मुंबईच्या प्रकल्पांना आधुनिकता प्रदान करणारी ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

               नेदरलँड्सच्या शिष्टमंडळाने तुर्भे येथील एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तसेच कोपरखैरणे येथील सांडपाणी प्रक्रिया आणि टर्शअरी ट्रिटमेंट प्रकल्पांसह विविध सुविधांना भेट देत त्याविषयी माहिती जाणून घेतली. सीबीडी बेलापूर येथील वस्त्र कच-यापासून पुनर्प्रक्रियेव्दारे उपयोगी वस्तू निर्मिती केंद्राला भेट देऊन तेथील संकल्पनेचे व व्यवस्थेचे त्यांनी कौतुक केले. 

               नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने भारत – डच सहकार्यासाठी संयुक्त कार्यप्रणाली ठरवून प्रायोगिक प्रकल्प निर्मिती तसेच क्षमता बांधणी आणि ज्ञान देवाणघेवाणीवर लक्ष केंद्रित करण्याचा विचार या अभ्यासभेटी दरम्यान परस्पर विचार – विनिमयातून ठरविण्यात आला.