पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट'ने सजली दीपावली; राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वराची बरसात
पनवेल म्हणजे सांस्कृतिक चळवळ, त्यामुळे पनवेलमधील निसर्गरम्य अशा वडाळे तलाव येथे झालेल्या या कार्यक्रमाने नेहमीप्रमाणे पनवेलच्या संस्कृतीमध्ये भर घातली. दीपावली म्हंटली कि दिव्यांचा, आनंदाचा आणि संस्कृतीचा सण. या सणानिमित्त लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वत्र आनंद आणि विविध कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळते. त्यात सुरांच्या अविष्कारांनाही अनन्य साधारण महत्व आहे. या 'दिवाळी पहाट' मध्ये सप्तसुरांची उधळण करत दिवाळीला सुमधुर सुरांचा साज पनवेलकरांना अनुभवायला मिळाला. निरागस सुरांचा फराळ, विरळ धुक्याची झालर, त्यात सुटलेला प्रसन्न पहाट वारा, सुर्याची सु वर्ण किरणे आणि क्षितिजाला गवसणी घालणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे व श्री. जयदीप यांच्या सुमधूर सुरावर रसिकांनी भरभरून दाद दिली. यावेळी संपुर्ण सात्विक व आल्हाददायी, मनमोहक वातावरणाने पनवेल मंत्रमुग्ध झाले होते. या सुरेल मैफिलीचे पनवेलकरांनी कुटुंबासह व मित्रपरिवारासह मनमुराद आनंद घेतला. दिवाळी पहाटेचे एक अनोखे नाते आहे. दिवाळी अंकांसोबतच मराठी-हिंदी भावस्पर्शी गाण्यांनी दिवाळीची पहाट सुरेल करण्याची परंपरा जपायला मराठी रसिकांना आवडते. या दिवाळी पहाटमध्ये गाणी अप्रतिम सादर करून रसिकांमध्ये चैतन्य खुलविले. त्याचबरोबरीने ताल वाद्यवृंद समूहानेही आपल्या वादनातून उपस्थितांची वाहवा मिळवली. पहाट एवढी रंगली होती की, रसिकजन सुरांच्या ठेक्यात आणि सुरांनी त्यांच्या हृदयात घर केले होते. असे अनेक सुरेल संगीताचा खजिना यावेळी सादर होत असताना रसिकांनीही भरभरून दाद दिली. तसेच निवेदक विनित देव यांनी आपल्या उत्तम निवेदन करत या कार्यक्रमात आणखी रंगत आणली. उदंड प्रतिसाद लाभलेल्या या दिवाळी पहाटची सुरुवात सूर निरागस हो गणपती, कानडा राजा पंढरीचा, वाहतो या इथे ज्ञानरूपी झरा, धुंद होते शब्द सारे, आज म्हारे घर आओ, पांडुरंग नामी लागला ध्यास, मन उधाण वाऱ्याचे, स्वर सुखाची सावली, ओळ्या सांजवेळी, उरले उरात काही, शरद सुंदर, मला वेड लागले प्रेमाचे, आता वाजले कि बारा, अप्सरा आली, या गाण्यांनी होत समारोप पसायदानाने झाले.
या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची मान्यवर म्हणून प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जेष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, प्रांताधिकारी पवन चांडक, महानारपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये, भाजपचे माजी शहर अध्यक्ष जयंत पगडे, अनिल भगत, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, नविन पनवेल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ यांच्यासह विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळीही व्यासपीठ अत्यंत आकर्षक होते. देवीचे रूप आणि पैठणीचा साज विशेष आकर्षणे होती. त्याचबरोबर रसिकांसाठी ४५०० हजार खुर्च्यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. रेकॉर्डब्रेक रसिकांची गर्दी झाल्याने आसनव्यवस्था पूर्णपणे भरून गेली होती. त्यामुळे रसिकांनी परिसरात भेटेल त्या जागी काहींनी बसून तर काहींनी उभे राहून या कार्यक्रमाचा मनमुरादपणे आनंद घेतला. उत्तम आयोजन आणि संयोजनात झालेल्या यंदाच्या या दिवाळी पहाटेचे ९ वे वर्ष होते.
कोट- पनवेलकर सांस्कृतिक वारसा जपणारे आहेत. त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. मी आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त मंगेश चितळे, माजी सभागृहनेते परेश ठाकूर आणि समस्त पनवेलकरांचे आभार मानते. सुंदर दिवाळी पहाट चे आयोजन आणि चांगला रसिकवर्ग असल्याने पुन्हा पुन्हा यावे असे मनापासून वाटते. - सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे
कोट- पनवेल सांस्कृतिक चळवळ जपणारे आहे. आजच्या कार्यक्रमाला पाच हजारांहून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवून भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे कार्यक्रमाची जागा अपुरी पडली. अशाच प्रकारच्या उपक्रमांद्वारे आपण पनवेलची सांस्कृतिक चळवळ अधिक वृद्धिंगत करत राहू, उदंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. - परेश ठाकूर, माजी सभागृहनेते- पनवेल महानगरपालिका

