अधिस्वीकृती पत्र देण्यासंबंधीचे नियम
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग 19 सप्टेंबर 2007 रोजी प्रसार माध्यमांशी संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती पत्रिका देण्यासंबंधीचे नियम याबाबत शासन निर्णय प्रसिध्द केला आहे. हे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्विकृती नियम 2007 (वितरण व नियंत्रण) या नावाने ओळखले जाते.
वृत्तपत्रे व प्रसार माध्यम संस्थांच्या प्रतिनिधींना अधिस्वीकृती मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाना शिफारस करण्यासाठी शासनाने महाराष्ट्र राज्य वृत्तपत्रे व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समिती नियुक्त केलेली आहे. वेगवेगळया जिल्ह्यातून येणाऱ्या अर्जांचा विचार करुन राज्य समितीला शिफारस करण्यासाठी 9 विभागीय समित्या आहेत.
*अधिस्वीकृती कोणाला घेता येते –* वृत्तपत्रे, वृत्तसंस्था यांचे मालक संपादक (यात दैनिक, साप्ताहिक, अर्धसाप्ताहिके, पाक्षिके), श्रमिक पत्रकार व छायाचित्रकार, करार पध्दतीने नेमणूक झालेले पत्रकार, स्वतंत्र व्यवसायिक पत्रकार, स्वतंत्र व्यवसायिक छायाचित्रकार, ज्येष्ठ पत्रकार, साप्ताहिकांचे मालक संपादक, इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधील कॅमेरामन व प्रतिनिधी.
*आवश्यक कागदपत्रे –* विहित नमुन्यातील अर्ज, वृत्तपत्राचे आर.एन.आय प्रमाणपत्र, डिक्लेरेशन, विहित नमुन्यातील खपाचा दाखला, किमान 12 वी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र (छायाचित्रकारांसाठी किमान 10 वी उत्तीर्ण) ,आवश्यकतेनुसार किमान 3 वर्षे अनुभवाचे प्रमाणपत्र, 1 वर्षाच्या अंकाच्या प्रती, नियुक्तीपत्र अथवा करार, आर.एन.आयकडे पाठविलेले वार्षिक विवरणपत्र, गेल्या 6 महिन्यातील नावावर प्रसिध्द झालेल्या बातम्यांची कात्रणे अथवा संपादकांची सही, शिक्का, वेतनचिठ्ठी, स्वयंघोषणापत्र, 2 पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे, स्वतंत्र व्यवसायिक पत्रकार व छायाचित्रकारांसाठी संपादकांची शिफारस, तिन्ही वृत्तपत्रांची गेल्या 6 महिन्यातील नावावर प्रसिध्द झालेली कात्रणे अथवा संपादकाची सही, शिक्का, किमान 5 वर्ष अनुभवाचे प्रमाणपत्र.
*ज्येष्ठ पत्रकार –* ज्यांना 30 वर्षे अनुभव आहे व ज्यांनी वयाची 60 वर्षे पूर्ण केली आहेत, असे निवृत्त, श्रमिक, स्वतंत्र व्यवसायिक, मालक-संपादक संवर्गातील पत्रकार व छायाचित्रकार. ज्यांना 20 वर्षे सलग अनुभव आहे व ज्यांनी वयाची 50 वर्षे पूर्ण केलेली आहेत, असे कार्यरत श्रमिक/स्वतंत्र व्यवसायिक/मालक संपादक संवर्गातील पत्रकार व छायाचित्रकार.
*इलेक्ट्रॉनिक माध्यमातील कॅमेरामन व प्रतिनिधी –* विहीत नमुन्यातील अर्ज, अद्ययावत अप लिंकिंग, डाऊन लिंकिंग प्रमाणपत्र, किमान 12 वी उत्तीर्ण, कॅमेरामनसाठी किमान 10 वी उत्तीर्ण, जन्मतारखेचा पुरावा, मागील 6 महिन्यातील किमान 6 बातम्यांचा पेन ड्राईव्ह, विहित नमुन्यातील नेमणूक पत्र किंवा करारपत्र, वेतनचिठ्ठी, किमान 3 वर्षे अनुभव प्रमाणपत्र, स्वयंघोषणापत्र, 2 पासपोर्ट साईज फोटो.
दैनिकाचा आकार – 20 X 30 व पृष्ठ संख्या 4 असावी. साप्ताहिक किमान आकार 10 x 15 , पृष्ठ संख्या 4. नियमित प्रकाशन हा महत्वाचा निकष आहे. दैनिकाचे एका वर्षात किमान 300 , साप्ताहिकांचे 40 अंक प्रकाशित होणे आवश्यक आहे. दैनिकाचा खप रोज 3 हजार पेक्षा जास्त हवा. साप्ताहिकांचा खप 1 हजार पेक्षा अधिक हवा. खपाच्या पुराव्यासाठी सनदी लेखापालांचा दाखला किंवा एबीसी प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे लगतच्या कालावधीतील असावे. याचबरोबर आरएनआयला पाठविलेल्या वार्षिक अहवालाची प्रमाणत प्रतही जोडणे आवश्यक आहे. दैनिकाच्या प्रकाशनाला किमान 6 महिने व साप्ताहिकाच्या प्रकाशनाला किमान 1 वर्षे पूर्ण झालेले असावे. त्याचबरोबर कोटा शिल्लक आहे, याची खात्री करुनच अर्ज स्वीकारले जातील.
*अधिस्वीकृती सवलती –* अधिस्वीकृती पत्रिका धारक पत्रकारांना महाराष्ट्र शासनातर्फे एसटी प्रवास मोफत सवलत दिली जाते. शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी मधून वैद्यकीय किंवा आकस्मिक कारणांसाठी आर्थिक मदत, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून वैद्यकीय मदत, शासकीय विश्रामगृहातील आरक्षणात राजशिष्टाचारानुसार प्राधान्य, म्हाडा/सिडकोमार्फत निघणाऱ्या घरांच्या सोडतीमध्ये आरक्षण सवलती दिल्या जातात.
अधिस्वीकृती पत्रिका प्राप्त करण्यासाठी, अधिक माहितीसाठी पात्र पत्रकारांनी जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा, आसे आवाहन करण्यात येत आहे.
000 प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी