शिष्याच्या कंठात झाले गुरुंचे अवतरण
पनवेल (प्रतिनिधी) प्रख्यात संगीततज्ञ उस्ताद अस्लम हुसैन खान यांच्या पुण्यस्मृतीप्रित्यर्थ अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ नवी मुंबई व हिंदुस्तानी संगीत अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या खुशरंग संगीत महोत्सवात संगीत पर्वणी सादर होताना शिष्याच्या कंठातून गुरुंचे अवतरण झाले.
वाशी येथील अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळाच्या सभागृहात झालेल्या या महोत्सवास प्रमुख मान्यवर म्हणून ज्येष्ठ सितारवादक उस्ताद रफ़त खान, ज्येष्ठ शास्त्रीय गायक 'भजन महर्षी' पं. निवृत्ती बुवा चौधरी, 'भजन रत्न' पं. महादेव बुवा शहाबाजकर, जागतिक कीर्तीचे डॉ. प्रितेश आचार्य, सिडको युनियनचे माजी अध्यक्ष नीलेश तांडेल, विनोद पाटील, जे. टी. पाटील, भारतीय सनगर समाजाचे उपाध्यक्ष अनिल राऊत, शास्त्रीय गायक महेश कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रथम प्रस्तुती वाराणसीच्या डॉ. शिवानी आचार्य यांची होती. त्यांच्या गायनाला तबल्यावर पं. निषाद पवार व संवादिनीवर अभिषेक काटे यांची साथ लाभली. त्यांनी राग मधुवंती मध्ये विलंबित एकतालात बांधलेली पारंपरिक बंदिश "तेरो गुण गाऊं" सादर केली. त्यानंतर त्यांनी गुरु प्रभावरंग यांच्या रचनेवर आधारित "गुरु चरणन मे ज्ञान विराजे" ही तीन तालातील बंदिश सादर केली. यानंतर चैती "राम जी के भइले जनमावा हो रामा" सादर करून श्रीरामलल्लाच्या स्वरूपाचे संगीतमय चित्रण केले. त्यानंतर शिव महिमेवरील दादरा "कहा नाही हौ भोला" सादर करत भक्तिभावाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सादरीकरणाचा समारोप श्रीकृष्ण भजनाने झाला. द्वितीय प्रस्तुती प्रा. विश्वास जाधव यांचे स्वतंत्र तबलावादन होते. त्यांना संवादिनीवर साथ केली अभिषेक काटे यांनी. प्रा. विश्वास यांनी तबल्याच्या विविध लयकारीतून तिहाई, रेले व कायदा यांचा सुंदर संगम सादर केला. अंतिम प्रस्तुती रायगड जिल्ह्याचे सुपूत्र विद्वान शास्त्रीय गायक पं. उमेश चौधरी यांनी सादर केली. त्यांनी आपल्या गुरु उस्ताद अस्लम खान खुशरंग यांना स्वरांजली अर्पण केली. त्यांना तबल्यावर पं. विनायक नाईक आणि संवादिनीवर अभिषेक काटे यांची साथ लाभली. पं. उमेश चौधरी यांनी राग केदार मध्ये विलंबित एकतालातील "ए बन ठन का" ही बंदिश सादर केली. त्यानंतर द्रुत तीन तालात "कान्हा रे नंद नंदन" ही रससिक्त बंदिश, तर "तनादि तन तदीम दीम तन देरेना" असा तराना सादर करत लयकारीचे उत्कृष्ट दर्शन घडवले. त्यानंतर राग भैरवी मध्ये झपतालातील देवी स्तुती "भवानी दयानी", आणि शेवटी महाराष्ट्राच्या पारंपरिक लोकशैलीतले भजन "हेची दान देगादेवा" सादर करून आपल्या गायनातून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुरेख संचालन सोपान आढव यांनी केले.