महापालिकेच्यावतीने ‘पर्यावरण एक तास’-के एल ई महाविद्यालयात हवामान बदल साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन
पनवेल,दि.08 : माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत पर्यावरण संवर्धन व संरक्षण याचे महत्व शालेय स्तरावर, महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे बिंबवण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये, महाविद्यालयामध्ये ‘पर्यावरण तास’ हा उपक्रम पनवेल महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी दिनांक 0६ फेब्रुवारी रोजी के एल ई महाविद्यालयात ' हवामान बदल साक्षरता' कार्यक्रम घेण्यात आला.
माझी वसुंधरा अभियान 5.० अंतर्गत पर्यावरणाचे महत्व शालेय विद्यार्थ्यांना समजावे यासाठी "पर्यावरण तास" हा उपक्रम उपायुक्त डॉ.वैभव विधाते यांच्या सूचनेनूसार महापालिका कार्यक्षेत्रातील महाविद्यालामध्ये, विद्यालयांमध्ये राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आकाश, जल, वायू, भूमी, अग्नि या माझी वसुंधरा अभियानातील महत्वाच्या घटकांनूसार कृती कार्यक्रम, शिबिरे,व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, वृक्षारोपण, प्रश्नमंजूषा, चर्चासत्र, गटचर्चा , विविध खेळांचे आयोजन करण्यात येत आहेत.
के एल ई महाविद्यालयात महापालिकेच्यावतीने ‘पर्यावरण तास’ या उपक्रमांतर्गत ‘हवामान बदल साक्षरता’ याविषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच ‘वनतोडीचा हवामान बदलावर होणारा परिणाम, शून्य कचरा जीवनशैली प्राप्त करू शकतो ? , पर्यावरण समस्यांवर तंत्रज्ञानाची भूमिका, पर्यावरण संरक्षणात वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारी व पाणी संवर्धन: शाश्वत भविष्यसाठी उपाययोजना या विषयांवरती गट चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या गट चर्चेमध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी माझी वसुंधराची शपथ घेतली.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. विजय मेंढुळकर ,एनएसएस चे कार्यक्रम अधिकारी शितल घार्गे, विशाल छावरिया, एनएसएसचे सदस्य शुभांगी सपकाळ, माधवी जोशी, रिया मेहतर यांचे सहकार्य लाभले.