अनधिकृत होर्डींगविरोधी कारवाईत 34 मोठ्या होर्डींगवर निष्कासनाची धडक कारवाई


                                                         

 

अनधिकृत होर्डींगविरोधी कारवाईत 34 मोठ्या होर्डींगवर निष्कासनाची धडक कारवाई    




 

13 मे रोजी सायं. 4 नंतर सुरू झालेले वादळी वारे आणि अकाली पर्जन्यवृष्टी कालावधीत मुंबईत घाटकोपर येथे होर्डींग पडून घडलेल्या दुर्घटनेनंतर नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आपत्ती निवारण कार्यवाहीच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभागांची तातडीने बैठक घेतली. त्यमध्ये परवाना विभाग तसेच अतिक्रमण विभागाला सतर्क होऊन अनधिकृत होर्डींग विरोधी कारवाईचे निर्देश दिले होते.

त्यास अनुसरून अतिक्रमण विभागामार्फत उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली अनधिकृत होर्डिंग विरोधातील धडक कारवाई लगेचच सुरू करण्यात आली. या अनुषंगाने रात्रंदिवस कारवाई करीत पहिल्या 3 दिवसात 31 मोठे होर्डींग निष्कासित करण्यात आले होते.

हीच कारवाईची तीव्रता कायम राखत त्यानंतर 18 मे रोजी मध्यरात्रीपासून 19 मे रोजी पहाटेपर्यंत आणखी 3 होर्डींगवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

यामध्ये नेरूळ विभागात सायन पनवेल रोडशेजारी असलेल्या लक्ष्मीवाडी येथील 2 मोठे अनधिकृत होर्डींग निष्कासित करण्यात आले. अशाप्रकारे तेथील चारही होर्डींग्जचे निष्कासन करण्यात आले.

याशिवाय कोपरखैरणे विभागात ठाणे बेलापूर रोड येथे यू ब्रिज लगत असलेले 1 अनधिकृत होर्डींग काढण्यात आले.

अशाप्रकारे आणखी 3 मोठ्या अनधिकृत होर्डींगचे निष्कासन करीत एकूण 34 मोठे अनधिकृत होर्डींग्जचे निष्कासन करण्यात आले. याशिवाय आज कोपरखैरणे सेक्टर 2 येथील अनधिकृत होर्डींग हटविण्याची कामगिरी सुरू आहे.

         राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत होर्डींगविरोधी धडक मोहीम राबविण्यात येत असून या तोडक मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीत अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली अतिक्रमण विभागाचे सहा. आयुक्त व सर्वच विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि त्यांचे अधिनस्त अधिकारी, कर्मचारी व तांत्रिक कर्मचारी आणि कामगार यांनी अथकपणे गतीमान कार्यवाही केलेली आहे.