आय.टी.एफ. लंडन या बहुराष्ट्रीय संघाच्या शिष्टमंडळाची जेएनपीए बंदराला भेट !
उरण दि १६(विठ्ठल ममताबादे )इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडेरेशन लंडन ( आयटीएफ ) या बहुराष्ट्रीय संघाच्या भारतीय संलग्न संघटनांच्या प्रतिनिधिंसोबत दोन दिवसीय परिषदेचे आयोजन एबेंसेडेर हॉटेल मुंबई येथे करण्यात आले होते. या परिषदेसाठी पॅट्रीक, एनरिको (लंडन )तसेच जेन्स व चेकर (स्विडन) राजेंद्र गिरी( दिल्ली )हे आयटीएफ चे प्रतिनिधी उपस्थित होते. न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा आयटीएफ या बहुराष्ट्रीय संघाच्या लॉजिस्टिक्स् सेक्टरचे व्हाईस चेअरमन कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या उपस्थितीत या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. या परिषदेसाठी देशभरातून दहा आयटीएफ संलग्न संघटनांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. या परिषदेत जगभरातील कामगारांचे प्रश्न व समस्या यावर चर्चा झाली.दोन दिवसीय परिषदेनंतर परदेशी पाहुण्यांनी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या शेलघर निवास स्थानी भेट दिली. कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी पाहुण्यांचा यथोचित केलेला पाहुणचार व सन्मानाने विदेशी पाहुणे भारावून गेले.त्यानंतर शिष्टमंडळाने कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात जेएनपीए बंदराला भेट दिली. प्रथम जेएनपीए प्रशासकीय इमारतीत प्रबंधक मनीषा जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी ध्वनीचित्रफिती द्वारे कार्यप्रणालीची माहिती दिली व पाहुण्यांचे भेटवस्तू देवून आदरातीथ्य केले. नंतर शिष्टमंडळाने जेएनपीएच्या कार्यप्रणालीची प्रत्यक्ष पहाणी केली. यावेळी न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत व त्यांचे सहकारी सोबत होते.