नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधितांकरिता विशेष बाब म्हणून सिडकोतर्फे भूखंडाचा ताबा दिल्यापासून ६ वर्षांचा बांधकाम कालावधी मंजूर
सिडकोच्या प्रचलित धोरणानुसार पुनर्वसन आणि पुन:स्थापना योजनेंतर्गत सिडको प्रकल्पबाधितांना वाटपित करण्यात आलेल्या भूखंडांवर बांधकाम करण्यासाठी सर्वसाधारणत: करारनामा झाल्यापासून ४ ते ६ वर्षांचा कालावधी देण्यात येतो. परंतु विशेष बाब म्हणून सिडको महामंडळातर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांना वाटपित भूखंडावर बांधकाम करण्याकरिता, भूखंड ताब्यात दिल्यापासून ६ वर्षांचा बांधकाम कालावधी मंजूर करण्यात आला आहे.
“राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या प्रकल्पाकरिता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित देत असलेले योगदान लक्षात घेता, श्री. एकनाथ शिंदे, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या निर्देशानुसार विशेष बाब म्हणून बांधकाम पूर्ण करण्याकरिता या प्रकल्पबाधितांना भूखंडाचा ताबा दिल्यापासून ६ वर्षांचा कालावधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे प्रकल्पबाधितांना सुलभतेने भूखंडाचा विकास करता येणार आहे. ”
श्री. अनिल डिग्गीकर
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
प्रचलित धोरणानुसार बांधकाम कालावधी हा करारनामा झाल्याच्या दिनांकापासून गणला जातो. परंतु नवीन ठरावानुसार आता भूखंडाचा ताबा दिल्याच्या दिनांकापासून पुढील ६ वर्षांच्या कालावधीत विमानतळ प्रकल्पबाधितांना बांधकाम पूर्ण करता येणार आहे. सदर ६ वर्षांचा कालावधी हा बांधकाम पूर्ण करण्याकरिता वैध असल्याने भूधारकांना विहित मुदतीपर्यंत बांधकाम मुदतवाढीसाठी अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही. मात्र सदर ६ वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर बांधकाम पूर्णत्वास गेले नसल्यास, भूधारकांना नियमानुसार बांधकाम कालावधी वाढवून घेणे व बांधकाम मुदतवाढीकरिता अर्ज करणे अनिवार्य असणार आहे, याची कृपया नोंद घेण्यात यावी.