स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सामाजिक आशय असलेल्या लघुपटांचे सादरीकरण संपन्न-या अनोख्या उपक्रमास उपस्थितांनी दिली भरभरून दाद
*अलिबाग, दि.13 (जिमाका):-* स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात दि.12 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर आज दि.13 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा नियोजन सभागृहात "सामाजिक आशय असलेल्या लघुपटांचे सादरीकरण" हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या अनोख्या उपक्रमास उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, जिल्हा प्रशासन अधिकारी शाम पोशेट्टी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, तहसिलदार विशाल दौंडकर, डॉ. सतीश कदम, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अरुण पवार, विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अलिबाग - रायगड मधील कलावंतांनी बनविलेल्या सामाजिक विषयावरील लघुपटांचे सादरीकरण करण्यात आले.
यामध्ये जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली "सप्तसुत्री" हा आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाच्या विषयांशी संबंधित लघुपटाचे सादरीकरण करण्यात आले.
निलेश व मीरा कार्लेकर निर्मित "तिरंगा" या देशभक्तीपर गीतांचा लघुपट या कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला. टीम क्षितिजद्वारे बनविलेला हा म्युजिक व्हिडिओ आजच संध्याकाळी यूट्युबवरही प्रदर्शित करण्यात आला. निलेश कार्लेकर हे स्वतः रायगड जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागातील कर्मचारी आहेत.
एक्सप्रिमेंटल मूव्हीज, अलिबाग तर्फे एक्सप्रिमेंटल मूव्हीज ही संस्था अलिबागमधील कलाकारांनी एकत्र येऊन स्थापन केलेली निर्मिती संस्था आहे. अनेक लघुपट, जाहिराती, म्युजिक व्हिडीओ, चित्रपट या संस्थेतर्फे बनविले गेले आहेत. बालमजूर आणि त्यांच्या शिक्षणाच्या आस्थेचे चित्रण करणारा "इटया" हा लघुपट यावेळी प्रक्षेपित करण्यात आला. एका वीटभट्टी मजूराच्या मुलाची शिक्षणाची ओढ आणि परिस्थितीने लादलेली अगतिकता याचे चित्रण मनिष अनसुरकर दिग्दर्शित या लघुपटात करण्यात आले आहे.
यानंतर एका सैनिकाच्या निरागस मुलाची गोष्ट असलेल्या संदेश गायकवाड दिग्दर्शित "अनारकली " या लघुपटाचे सादरीकरण करण्यात आले.
"नारीशक्ती" ला अधोरेखित करणारा फ्रायडे फिल्म्स प्रोडक्शन निर्मित, किरण साष्टे दिग्दर्शित "मी टू" हा लघुपटही उपस्थितांना खूपच भावला.
ग्रामीण भागातल्या लहान मुलीची गोष्ट असलेला आणि अनेक पुरस्कार मिळालेला एक्सप्रिमेंटल मूव्हीज व संतोष बोन्द्रे दिग्दर्शित "जिऊ" हा लघुपटही सर्वाना खूपच आवडला.
या संपूर्ण उपक्रमाच्या समन्वयाची जबाबदारी जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे यांनी पार पाडली. या अनोख्या उपक्रमाबाबत उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटाने भरभरून दाद दिली.