नवी मुंबई महानगरपालिका-
*आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्याकडून भर पावसात नवी मुंबईतील खड्डे दुरुस्ती कामांची प्रत्यक्ष पाहणी*
पाऊस पडत असताना महानगरपालिकेच्या क्षेत्रीय अधिकारी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहून नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची दक्षता घ्यावी व आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. त्यानुसार मागील 3 दिवसांपासून अतिवृष्टीच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी महानगरपालिका यंत्रणा सतर्कतेने काम करीत आहे.
*महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेताना काल 6 जुलै रोजी रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरण्याचे आदेश सर्व यंत्रणांना दिले होते. त्यास अनुसरून आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यांवर खड्डे असल्यास ते त्वरित दुरुस्त करून घेण्याचे निर्देश अभियांत्रिकी विभागास दिले होते. त्यानुसार सर्वच विभागीय कार्यक्षेत्रात युध्द पातळीवर काम सुरु करण्यात आले असून आज आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी शहरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली व खड्डे दुरुस्ती करणा-या पथकांची संख्या वाढवून दोन्ही पाळ्यांमध्ये दिवसरात्र काम करण्याचे निर्देश दिले.*
शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून पावसाळा पूर्व कालावधीत नियोजन बैठका घेत असताना रस्त्यांवर खड्डे असू नयेत व त्याबाबत अत्यंत सतर्क रहावे अशा सूचना आयुक्तांनी सर्व प्राधिकरणांना केल्या होत्या. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या तुलनेने कमी असली तरी खड्ड्यांमुळे रहदारीला व वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये तसेच नागरिकांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेत महानगरपालिका दक्ष आहे. या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या खड्डे दुरुस्ती कामांची पाहणी आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी शहर अभियंता श्री. संजय देसाई यांच्यासह आज केली.
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्स या अत्याधुनिक पध्दतीचा वापर महानगरपालिकेच्या वतीने केला जात असून काही ठिकाणी रेडिमेक्स कॉँक्रीटचाही वापर केला जात आहे. कोल्डमिक्स अथवा रेडीमिक्स कॉँक्रिटचा वापर करताना ते व्यवस्थितरित्या एकजीव होईल याची काळजी घ्यावी असे सूचित करतानाच खड्डे दुरुस्तीची सुरू असलेली कामे गुणवत्तापूर्ण करावीत व पुन्हा करावी लागणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी सर्व ठिकाणी दिले.
सध्या प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रात खड्डे दुरुस्तीकरिता प्रत्येकी 4 पथके कार्यरत असून त्यामध्ये वाढ करण्याचे सर्व कार्यकारी अभियंता यांना सूचित करतानाच आयुक्तांनी कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता या सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व रस्त्यांची पाहणी करावी व खड्डे बुजविण्याच्या कामाकडे बारकाईने विशेष लक्ष द्यावे असे निर्देश दिले. एखाद्या रस्त्यातील खड्डे बुजविण्यास सुरुवात केल्यानंतर तो रस्ता पूर्ण करावा तसेच अधिकची पथके कार्यान्वित करून एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणच्या रस्ते दुरुस्तीकडे लक्ष द्यावे असेही आयुक्तांनी निर्देश दिले.
रस्ते दुरुस्ती कामे होत असताना वाहतुकीला कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सूचना करतानाच दिवसाच्या कालावधीत मुख्य रस्त्यावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेता त्याठिकाणची कामे परिस्थिती पाहून रात्री करावीत असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
*4 जुलै पासून मागील 3 दिवसात 7 जुलै पर्यंत 477.22 मि.मि. इतका पाऊस नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पडलेला असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यानंतर लगेचच सर्व यंत्रणेला आपापल्या क्षेत्रात उपस्थित राहून आवश्यकतेनुसार त्वरित मदतकार्य करण्याचे निर्देश दिले होते.*
*त्यानुसार महानगरपालिकेची यंत्रणा सतर्कतेने कार्यरत असून 24 X 7 अहोरात्र सुरु असणारे मुख्यालयातील प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र आणि सर्व 4 अग्निशमन केंद्रातील आपत्कालीन नियंत्रण कक्ष तसेच आठही विभाग कार्यालयातील विभागीय नियंत्रण कक्ष याव्दारे परिस्थितीवर नियंत्रण ठेवले जात आहे व मदतकार्य पुरविण्यात येत आहे.*
*नवी मुंबई शहर समुद्रसपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने काही सखल भागात भरतीच्या काळात अतिवृष्टी झाल्यास पाणी भरण्याची शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिेकेने त्याठिकाणी पाणी उपसा पंप व इतर अनुषांगिक व्यवस्था केलेली आहे. तरी नागरिकांनी कोणत्याही मदतीसाठी महानगरपालिकेच्या आपल्या विभागातील आपत्ती निवारण कक्षाशी संपर्क साधावा अथवा महापालिका मुख्यालयातील मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी 022-27567060 / 61 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 1800222309 / 10 या टोल फ्री क्रमांकावर विनामूल्य संपर्क साधावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.*