नवी मुंबई महानगरपालिका- हिवताप प्रतिरोधासाठी विशेष डास उत्पत्ती शोध मोहिम

 नवी मुंबई महानगरपालिका-  

                      हिवताप प्रतिरोधासाठी विशेष डास उत्पत्ती शोध मोहिम


 

 

केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून पाळण्यात येतो. 

पावसाळाच्या दिवसांमध्ये विविध प्रकारचे किटकजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते. आरोग्य विभागाने केलेल्या सुचनांचे पालन करुन नागरीकांनी पुरेशी दक्षता बाळगल्यास या आजारांवर वेळीच प्रतिबंध घालणे शक्य आहे.  त्यामुळे नागरीकांनी सतर्क राहून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.  हिवताप, डेंग्यु, चिकनगुन्या असे आजार होवू  नये यासाठी प्रत्येकाचा लोकसहभाग महत्वाचा आहे.  लोकसहभागानेच हिवतापासारख्या आजारापासून आपण मुक्ती मिळवू शकतो.  किटकजन्य आजरामध्ये हिवताप,  डेंग्यु, चिकनगुनिया यासारखे  आजार होतात.    यापैकी हिवतापाचा प्रसार ऍनाफिलिस डासाच्या मादीपासून होतो.  या डासांची उत्पत्ती साठलेल्या स्वच्छ पाण्यात उदाहरणार्थ पाण्याच्या टाक्या, कुलरचे पाणी, रांजण, माठ, स्वच्छ पाण्याची डबकी आदिसारख्या साठवलेल्या पाण्यात होते.  डास हिवताप रुग्णास चावतो.  त्यावेळेस रक्ताबरोबर हिवतापाचे जंतू डासाच्या पोटात जातात.  असा दूषित डास निरोगी माणसास चावल्यास 10 ते 12 दिवसांनी थंडी वाजून ताप येवून डासाद्वारे हिवतापाचा प्रसार होतो.  त्यादृष्टीने नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे जून  महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात आला असून सदर महिन्यामध्ये संवेदनशील कार्यक्षेत्रातील घरांतर्गत विशेष डास उत्पत्ती स्थाने शोध मोहिम तसेच ताप रुग्ण शोध मोहिम राबविण्यात आली.  या मोहिमे अंतर्गत माहे जून  2022 मध्ये 20 दिवसात एकूण 32190 एवढया घरांना भेटी देण्यात आलेल्या असून त्यापैकी एकूण 57405 एवढया घरांतर्गत स्थानांची तपासणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये एकूण 288 एवढी स्थाने दुषित आढळून आलेली आहेत.  

तसेच माहे जून महिन्यामध्ये 20 दिवसात नियमित घरांतर्गत डास उत्पत्ती स्थाने शोध मोहिमे अंतर्गत एकूण 64858 एवढया घरांना भेटी देण्यात आलेल्या असून त्यापैकी एकूण 919393  एवढया घरांतर्गत स्थानांची तपासणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये एकूण 1014 एवढी स्थाने दुषित आढळून आलेली आहेत. त्यापैकी 716 एवढी स्थाने नष्ट करण्यात आलेली असून उर्वरित 298 एवढी स्थाने उपचारीत करण्यात आलेली आहेत. 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या बांधकाम क्षेत्रातील  एकूण 17 ठिकाणी हिवताप जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.  त्यामध्ये एकूण 3483 इतके लोक सहभागी झाले असून त्यांचे प्रबोधन करण्यात आले.  तसेच कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी   हस्तपत्रक, पोस्टर्स व बुकलेटचे वाटप करुन   हिवताप/ संशयित डेंगी इ. किटकजन्य आजाराबाबतची जनजागृती करण्यात आलेली आहे.  

किटकजन्य आजार टाळण्यासाठी डासांची उत्पत्ती होवू न देणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.  यासाठी साचलेले पाणी वाहते करा.  पाण्याचा निचरा होण्यासाठी शोषखड्डयाचा वापर करावा.  घरासह सभोवतालची डासोत्पत्ती स्थाने नष्ट करा, गप्पी मासे पाळा, परिसर स्वच्छ ठेवा, साचलेल्या पाण्यावर रॉकेल किंवा खराब ऑईलचे थेंब टाका, सर्व पाण्याचे साठे झाकून बांधून ठेवा, आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, निरुपयोगी विहिरीत व साचलेल्या पाण्यात डास टळी भक्षक गप्पी मासे सोडावेत.  सायंकाळच्या वेळेस घराचे दारे खिडक्या बंद ठेवाव्यात व गोठयात पाला पाचोल्याचा धुर करावा.  डुकरांना दूर ठेवावे, दररोज मच्छरदाणीचा वापर करा, संडासाच्या वेंट पाईपला जाळी अथवा कपडा बसवणे, नाल्या वाहत्या करणे इ.

किटकजन्य आजाराच्या नियंत्रणासाठी आठवडयातून शनिवार हा एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. यादिवशी पाण्याची टाकी, रांजण, माठ, वॉटर कुलर, फ्रीजच्या मागील पाणी रिकामे करुन स्वच्छ पुसुन घ्यावे.  छतावरील खड्डे, टायर, भंगार वस्तू, नारळाच्या करवंटया, प्लास्टिक वस्तू, कुंडया खालची पेट्रीडिश, बादल्या, फ्रीजचे ट्रे, निरुपयोगी  माठ स्वच्छ पुसून घ्यावेत.  भांडयात पाणी साचू देवू नये, झाडाच्या कुंडया, प्राण्यांची पाणी पिण्याची भांडी यातील पाणी बदलत राहावे.  वापराच्या पाण्याची भांडी झाकून ठेवावी.  पाण्याच्या टाकीत गप्पी मासे सोडावेत.  मच्छरदाणीचा वापर करावा.  पूर्ण अंग झाकेल असे सैल कपडे वापरावेत.  डास होवू नये म्हणून डास अळीची पैदास रोखण्यात यावी.

हिवताप/संशयित डेंग्यु रुग्ण आढळल्यास जवळच्या महानगरपालिका रुग्णालयास त्वरीत माहिती द्यावी आणि रुग्ण संशोधन कार्यवाहीसाठी आपल्या घरी येणा-या आरोग्य कर्मचा-यांस तसेच फवारणी कामगारांना सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे. 


Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image