महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पनवेलने साजरा केला मराठी भाषा गौरव दिन
पनवेल/(विजयकुमार जंगम)-महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र पनवेलने जेष्ठ साहित्यिक वि.वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जन्मदिना निमित्त मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात बालग्राम, पनवेल येथे साजरा केला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. नीलिमा अरविंद मोरे, प्रमुख पाहुणे, असिस्टंट संचालक, नॅशनल सेफ्टी कौन्सिलचे महेंद्र शहाणे, प्रमुख वक्ते, गुणवंत कामगार व विशेष सहाय्यक, बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल शाखा, विशेष अतिथी दैनिक लोकमतचे पत्रकार मयूर तांबडे, कार्बन बिर्ला प्रा. ली. चे एच.आर. मॅनेजर, सचिन कंदले, लॉजिस्टिक अधिकारी संदीप उपाध्ये, सोलर ऍक्टिव्ह फार्म, बालग्रामचे अधीक्षक, डॉ. विनायक पाटील व कामगार कल्याण मंडळाचे केंद्र प्रमुख प्रवीण सकट आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते गुणवंत कामगार अरविंद मोरे यांनी मराठी दिन साजरा करत असल्याबद्दल महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कौतुक करून आभार मानले. अरविंद मोरे पुढे म्हणाले की, मातृभाषा ही हृदया पासून जोडलेली असते. मातृभाषेत आपण आपले विचार दुसऱ्यानं पर्यंत चांगल्या प्रभावी पद्धतीने पोहचवू शकतो. मराठी भाषा ही संदेश पोहचविण्याचे चांगले माध्यम आहे. मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे. मराठी भाषेत प्रत्येक गोष्टीला शब्द आहे. त्याला इतर भाषां मधून शब्द निर्यात करावे लागत नाहीत. आपण प्रत्येकाला आपल्या मराठी भाषेचा अभिमान असला पाहिजे. आपली मराठी भाषा समृद्ध करण्याची प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. घ्यासाठी आपण सर्वानी निर्भीड पणे मराठी बोलणे, लिहिणे व इतरांना प्रोत्साहन देणे फार गरजेचे आहे. त्यांनी मराठी दिनाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. नीलिमा अरविंद मोरे यांनी आपण मराठी दिन का साजरा करतो यासाठी सुरुवातीला कुसुमाग्रजांच्या साहित्याचा आढावा घेतला. त्यांनी याप्रसंगी मराठी भाषेतील इतरही साहित्यिकांच्या योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने आजचा स्तुत्य उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने मराठी भाषा संवर्धनाचे काम केले अशा त्या म्हणाल्या. त्यांनी भाषा कशी लोप पावते ह्याचे उदाहरण देऊन आपली मराठी भाषा लोपू नये ह्यासाठी विविध सूचना केल्या. डॉ. नीलिमा अरविंद मोरे यांनी ज्ञानेश्वरांनी मराठीची काव्य परंपरा सांगितली असे सांगितले. त्या हे पण म्हणाल्या की, मराठी भाषेला ज्ञानेश्वरांनी साहित्याच्या शिखराला हिमालयाची उंची मिळवून दिली व ज्ञान भांडार सर्वाना खुले करून दिले.
याप्रसंगी उपस्थित विशेष अतिथी मयूर तांबडे, महेंद्र शहाणे, संदीप उपाध्ये व सचिन कंदले यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करून मराठी भाषेच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रमुख अतिथी लोकमतचे युवा पत्रकार मयूर तांबडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचालन केंद्र प्रमुख प्रवीण सकट यांनी केले तर आभार प्रदर्शन वैजयंती हिने केले.