वाधवा कंस्ट्रक्शनकडून महाराष्ट्र सरकारची फसवणूक ?
अवैध उत्खनन केल्याची तक्रार देऊनही कारवाई नाही !
महसूल प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
पनवेल : राज भंडारी
तालुक्यातील अनेक जमिनी धनदांडग्यांनी विकत घेऊन ठेवल्या आहेतं, आज पनवेल परिसरातील जमिनींना आलेला भाव पाहता याठिकाणी निरनिराळ्या बांधकामांना वेग आला आहे. वाधवा कन्स्ट्रक्शन कंपनीने यापूर्वीच येथील आदिवासींच्या विरोधात कटकारस्थान केलेले प्रकार समोर आले आहेत. आता तर एकामागोमाग अनेक प्रकरणे समोर यायला लागली आहेत. मौजे वारदोली येथील महाराष्ट्र शासनाच्यावतीने घेण्यात आलेल्या जागेत वाधवा कन्स्ट्रक्शन कंपनी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने अवैध माती उत्खनन केल्याचा आरोप येथील स्थानिक शेतकरी करीत आहेत.
याबाबतचा अर्ज येथील स्थानिक शेतकरी अरुण पाटील यांनी डिसेंबर २०२१ रोजी पनवेल तहसील कार्यालयात सादर केल्यानंतर आज ३ महिने उलटून देखील या अर्जाचे उत्तर महसूल प्रशासनाकडून दिले जात नाही. एका बाजूला शासनाचा महसूल बुडताना दिसत आहे आणि दुसऱ्या बाजूला शासनाचे अधिकारीच या सर्व प्रकाराकडे कानाडोळा करताना दिसत आहेत. मे. वाधवा कन्स्ट्रक्शन कंपनीने शासकीय मिळकतींमधून वाधवा वाईज सिटी बिल्डिंग प्रोजेक्ट करीत आहे. याठिकाणी रस्त्याच्या कामासाठी लागणाऱ्या भरावासाठी ही कंपनी शासकीय मिळकतींमधून मिळालेल्या जमिनीचे उत्खनन करून रस्त्यांचा भराव करीत आहे. प्रत्यक्षात याबाबत माहिती घेतली असता, सदर उत्खनन हे बेकायदेशीर म्हणजेच कोणत्याही परवानग्या न घेता केले जात असल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे.
मौजे वारदोली येथील सर्व्हे नं. १२८/१५ मधील २६ गुंठे, सर्व्हे नं.११९/१६ मधील ३० गुंठे, सर्व्हे नं. ११९/१ मधील २० गुंठे अशा जागेत अनधिकृत उत्खनन केले जात आहे. सदर जागेचा पंचनामा करून शासनाला अहवाल सादर करण्यासाठी २० डिसेंबर २०२१ रोजी तहसील कार्यालयात अरुण पाटील या शेतकऱ्यांने अर्ज सादर केला, मात्र ३ महिने उलटूनही या जागेचा साधा पंचानामाही केला नसल्याचे महसूल विभागातून सांगण्यात आले.