पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियोजित जागेची केली पाहणी

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियोजित जागेची केली पाहणी


     अलिबाग,दि.15(जिमाका):- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी मौजे उसर, ता.अलिबाग येथील अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियोजित जागेची काल (दि.14 फेब्रुवारी ) रोजी पाहणी केली. त्यांनी यंदाच्या पहिल्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना सर्व महाविद्यालयीन विहित वेळेत सुविधा देण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही करण्याबाबत जिल्हा तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनास आवश्यक ते निर्देश दिले.

     यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, अप्पर जिल्हाधिकारी श्री.अमोल यादव, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कुरा, *डॉ. गिरीश ठाकूर,* सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.सुखदेवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, प्रांताधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार मीनल दळवी व संबंधित विभागांचे इतर अधिकारी उपस्थित होते.

     अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्र शासनाच्या अखत्यारितील भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मंजूरी मिळाली असून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीची प्रवेश प्रक्रिया यावर्षी सुरू होणार आहे. अलिबाग येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 रुग्ण खाटांचे संलग्नित रुग्णालय सुरू करण्याबाबत दि.31 डिसेंबर 2012 च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

     मौजे उसर येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह अलिबाग येथील राष्ट्रीय केमिकल्स अॅन्ड फर्टिलायझर्स लिमिटेड, थळ, अलिबाग या संस्थेच्या मौजे कुरुळ येथील वसाहतीतील जुनी शाळा, टाईप ए रेसिडन्सी क्वॉर्टरच्या सहा इमारती तसेच शाळेजवळच्या सहा एकर मोकळ्या जागेची पाहणी केली. त्याचप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याच्या दृष्टीने उपलब्ध झालेल्या साधन सामुग्रीचाही आढावा घेतला. हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री कु.तटकरे सातत्याने पाठपुरावा करीत असून संबंधितांकडून त्या याबाबतची माहिती नियमितपणे घेत आहेत.