जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून कातकरी उत्थान अभियानांतर्गत वाघोडे येथे दाखले वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न


जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून कातकरी उत्थान अभियानांतर्गत वाघोडे येथे दाखले वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

*आरोग्य तपासणी शिबिरांतर्गत अनेक आदिवासी बांधवांनी आरोग्य तपासणीचा घेतला लाभ*


अलिबाग,दि.26 (जिमाका):-

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे व तहसिलदार मीनल दळवी यांच्या  पुढाकारातून आदिवासी कातकरी उत्थान अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा वाघोडे येथे आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, दाखले वाटप तसेच विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन हे उपक्रम  राबविण्यात आले. 

       यावेळी आरोग्य शिबिराचा 109 जणांनी लाभ घेतला. त्यापैकी उच्च रक्तदाब तपासणी 38 जणांची तर 29 जणांची दंत तपासणी करण्यात आली.   

      जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, प्रांताधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार मीनल दळवी यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना जातीचे दाखले, ई-श्रम कार्ड, रेशन कार्ड इ. चे वाटप करण्यात आले. 

      यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केलेल्या सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना येत्या 31 मार्च 2022 अखेर मोफत दाखले वाटपाचे काम 100 टक्के पूर्ण करू व एकही आदिवासी बांधव दाखले मिळण्यापासून वंचित राहणार नाही, या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचा संकल्प व्यक्त केला.

      यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पेण शशिकला अहिरराव, संजय गांधी योजना नायब तहसिलदार मानसी पाटील, श्री.टोळकर, अलिबाग तालुका कृषी अधिकारी प्रदीप बैनाडे, वाघोडे सरपंच कृष्णा जाधव, उपसरपंच सुरेखा नाईक, मुख्याध्यापक राजेंद्र म्हात्रे, मंडळ अधिकारी जयेश ठाकुर, वाघोडे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सुमित माने, मुकेश नाईक, सरिता जाधव, या कार्यक्षेत्रातील सर्व तलाठी व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. 

      याप्रसंगी आदिवासी बांधव भगवान नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आरोग्यविषयक मार्गदर्शन धर्मेंद्र पुगावकर व कृषी विषयक मार्गदर्शन कृषी पर्यवेक्षक मोहन सूर्यवंशी यांनी केले. 

       या शिबीर कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून झाले.यावेळी वाघोडे शाळेतील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत तसेच आदिवासी पारंपारिक नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाम पाटील यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती जीविता पाटील यांनी केले.

      कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अलिबाग तालुक्यातील शासकीय अधिकारी-कर्मचारी, वाघोडे सरपंच, उपसरपंच, सदस्य, तलाठी, कोतवाल, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामस्थ या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले तर आरोग्य शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ.पूनम नाईक, डॉ.निशिगंधा म्हात्रे, डॉ.आदित्य पाटील, डॉ.रोशन पाटील, डॉ. अंतेश्वर वडमिलकर, डॉ.नवीन ठाकूर, डॉ.मंगेश नेमन,डॉ.हर्षल सोनवणे तसेच माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर वायशेतचे अध्यक्ष डॉ.राजाराम हुलवान डॉ.अक्षय कोळी, डॉ. प्रत्योत पाटील,डॉ.संजय काळेल व इतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.