पनवेल तालुक्यात शेकापला मोठा धक्का; चार गावातील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

 पनवेल तालुक्यात शेकापला मोठा धक्का; चार गावातील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश


पनवेल( प्रतिनिधी) निवडणुका जवळ आल्या की भूलथापा देऊन कार्यकर्ते व मतदारांची दिशाभूल करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला जनता पूर्णपणे कंटाळली आहे. त्याचा प्रत्यय प्रत्येक निवडणुकीत नागरिकांना येत असून, परिणामी शेकापला सातत्याने गळती लागलेली दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील बेलवली, दुंदरे, धोदानी आणि धामणी या चार गावांमधील शेकापच्या कार्यकर्त्यांनी आज (दि. ०४) भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केल्याने शेकापला आणखी एक मोठा हादरा बसला आहे.

हा पक्षप्रवेश सोहळा पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, युवा नेते अतुल घरत, मालडुंगे ग्रामपंचायतीचे सरपंच सीताराम चौधरी, दुंदरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश पाटील, राजेश भोईर, योगेश लहाने यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये बेलवली येथील राजेश बाळाराम पाटील, किशोर लडकू पवार, लक्ष्मण बाळाराम पाटील, दुंदरे येथील गजानन बबन उसाटकर, रवींद्र हिरु चौधरी, विभाग अध्यक्ष सुरेश बबन उसाटकर, एकनाथ कमलाकर चौधरी, गौरव एकनाथ चौधरी, धोदानी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य राम नागो चौधरी, प्रशांत राघो घुटे, कमळ्या जानू घुटे, सोनी राम चौधरी, शानू बाबूराव चौधरी, परशुराम निरगुडा तसेच धामणी गावातील गोमा खंडवी, सुरेश खंडवी, किसन खंडवी, मनोहर भस्मा, नितेश भस्मा यांचा समावेश आहे. या सर्वांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. भाजपचे विकासाभिमुख धोरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली विकासाची वाटचाल तसेच लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्यात झालेला सर्वांगीण विकास पाहून शेकापमधील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची भावना माजी सरपंच रमेश पाटील यांनी व्यक्त केली. भाजप अधिक बळकट करण्यासाठी व पनवेल तालुक्याच्या विकासासाठी सर्व कार्यकर्ते एकजुटीने काम करतील, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.