वासांबे जि.प.गटात महायुतीचा मजबूत पाया;तिन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्यांनी विजयी होतील - कैलास म्हात्रे

वासांबे जि.प.गटात महायुतीचा मजबूत पाया;तिन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्यांनी विजयी होतील - कैलास म्हात्रे



पनवेल (प्रतिनिधी) ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वासांबे जिल्हा परिषद गटात महायुतीची संघटनात्मक ताकद आणि जनसंपर्क प्रभावीपणे जाणवत असून मतदारांचा कल विकासाभिमुख नेतृत्वाकडे असल्याचा विश्वास महायुतीचे नेते कैलास म्हात्रे यांनी प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केला.
        वासांबे जिल्हा परिषद गटातून महायुतीच्या उमेदवार नेहा भूषण पारंगे, पंचायत समितीसाठी अर्चना भोईर, तर रीस पंचायत समिती गणातून कृष्णाशेठ गंगाराम पारंगे हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून तिन्ही ठिकाणी सकारात्मक वातावरण असल्याचे चित्र दिसत आहे.भाजप,शिवसेना (शिंदे गट)आणि आरपीआय(आठवले गट)यांच्या एकजुटीमुळे महायुतीची संघटनात्मक रचना अधिक भक्कम झाली आहे.गावोगावी प्रचार दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत असून मतदारांशी थेट संवादावर भर दिला जात आहे.
          कैलास म्हात्रे पुढे म्हणाले की, समाजकार्यासाठी कंबर कसून काम करणारे उमेदवार आम्ही दिले आहेत. विकासाचे एकच नाव.. नेहा पारंगे,अर्चना भोईर आणि कृष्णाशेठ पारंगे ही नावे म्हणजे विकासाची हमी आहेत. त्यांच्यामागे भाजपसारखा सक्षम पक्ष ठामपणे उभा आहे.मतदारांनी विकासाला प्राधान्य देत महायुतीला साथ द्यावी. नेहा पारंगे यांचे महिला सबलीकरणातील कार्य, अर्चना भोईर यांची तळागाळातील ओळख आणि कृष्णाशेठ पारंगे यांचा दांडगा जनसंपर्क या बाबी मतदारांमध्ये विश्वास निर्माण करणाऱ्या ठरत आहेत. गावपातळीवरील कार्यकर्ते,महिला मंडळे,युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी होत असून वातावरण निवडणूक प्रक्रियेबाबत उत्साही व सकारात्मक आहे. काम,विश्वास आणि विकास-महायुतीचा निर्धार"असा संदेश मतदारांपर्यंत पोहोचत आहे.