सी के टी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी भरत चौधरी यांची अमेरिकेतील न्यू जर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, न्यूयॉर्क या नामांकित संशोधन संस्थेत निवड

सी के टी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी भरत चौधरी यांची अमेरिकेतील न्यू जर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, न्यूयॉर्क या नामांकित संशोधन संस्थेत निवड


पनवेल :जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी  कुभरत स्वरूपम चौधरी यांची न्यू जर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीन्यूयॉर्क (अमेरिका) येथे पोस्ट डॉक्टरल रिसर्च असोसिएट (संशोधन सहाय्यक) म्हणून निवड झाली आहे. ते येत्या १ फेब्रुवारीपासून आपल्या नवीन पदावर रुजू होणार आहेत.

या उल्लेखनीय यशाबद्दल कुभरत स्वरूपम चौधरी यांचा आज महाविद्यालयात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कुभरत चौधरी यांनी चांगू काना ठाकूर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातून बी.एस्सी. पदवी प्राप्त केली असून मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयात एम.एस्सी. पूर्ण करत नेट-जेआरएफ ही राष्ट्रीय पात्रता (AIR-42) सन्माननीय यश मिळवत प्राप्त केली. भरत चौधरी यांना एम.एस्सी. त्यांच्या शिक्षणासाठी आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संपूर्ण आर्थिक सहाय्य केले होते.  

पुढे त्यांनी २०१९ ते २०२५ या कालावधीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER), पुणे येथे आपले पीएच.डी चे शिक्षण पूर्ण केले. 
स्टिम्युली रिस्पॉन्सिव्ह लैक्टोनायझेशन बेस पर्सल्फाइड जनरेटर हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. ‘लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचे पाठबळ आणि सीकेटी महाविद्यालयातील अध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभल्यामुळेच आपल्याला शैक्षणिक क्षेत्रात अशी उत्तुंग भरारी घेता आली. असे नमूद करत भरत चौधरी यांनी रामशेठ ठाकूर साहेबांचे तसेच महाविद्यालय व्यवस्थापनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. संशोधन  क्षेत्रात अभिमानास्पद  कामगिरी  करणार्‍या भरत चौधरी यांच्या या आंतरराष्ट्रीय यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेला आणखी एक गौरवशाली पान लाभले आहे.