आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा

 

­

आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा




 

नुकत्याच पार पडलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका शांततेने व सुव्यवस्थित पध्दतीने पार पडल्या असून यामध्ये महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांनी अतिशय चांगले योगदान दिले असल्याचे अधोरेखित करीत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सद्यस्थितीत सुरु असलेल्या महानगरपालिकेच्या प्रकल्प व सुविधा कामांचा विभागनिहाय आढावा घेतला.

महापालिका मुख्यालयातील विशेष समिती सभागृहात सर्व विभागांच्या आढावा बैठकीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे व इतर विभागप्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करतांना आगामी आर्थिक वर्षात करावयाच्या नियोजित सुविधा संकल्पांविषयी माहिती जाहीर करण्यात आली होती. त्या संकल्पांपैकी किती सुविधांची पूर्तता झाली तसेच प्रगतीपथावर असलेल्या सुविधांची सद्यस्थिती काय आहे याची  विभागनिहाय माहिती आयुक्तांनी संबधित विभागप्रमुखांकडून घेतली.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्तांचा सविस्तर आढावा घेतांना सद्यस्थितीत पूर्ण असलेल्या इमारतींचा सुविधा कामांसाठी वापर सुरु करावा असे निर्देश आयुक्तांनी दिले. याकरिता सुविधांसाठी आवश्यक जागांकरिता संबंधित विभागांनी मालमत्ता विभागाशी संपर्क साधून त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तांची पाहणी करावी व आपल्या सुविधांसाठी योग्य असलेल्या मालमत्ता ताब्यात घेऊन वापरात आणण्याची तत्पर कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी दिले. यामध्ये सर्व विभागातील बांधून तयार असलेल्या मार्केट इमारतींचे जागा वाटप करुन त्या उपयोगात आणण्याची कार्यवाही तत्परतेने करावी असे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.

मार्जिनल स्पेस व पदपथ याठिकाणी असलेली अतिक्रमणे व विनापरवानगी सुरु असलेल्या व्यवसायांवरील कारवाईचा वेग वाढवावा तसेच पर्यावरणाचे महत्व लक्षात घेऊन प्लास्टिक प्रतिबंधाची कार्यवाही तीव्र करावी तसेच विभागांमध्ये नियमितपणे प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमा सुरुच ठेवाव्यात असेही निर्देश आयुक्तांनी दिले.

निर्मितीच्या ठिकाणापासून म्हणजे घरापासूनच कचरा वर्गीकरणाचे प्रमाण वाढविण्यावर भर देण्यासाठी लोकांमध्ये अधिक व्यापक स्वरुपात जागरुकता करावी व त्याचा कृती आराखडा करुन तो अंमलात आणावा असेही निर्देश आयुक्तांनी दिले. नागरिकांकडून प्राप्त होणा-या तक्रारींचे निराकरण करण्याचा कालावधी कमी करावा व नागरिकांना तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीची माहिती मिळण्यासाठी अधिक काळजीपूर्वक कार्यवाही करावी असेही निर्देशित करण्यात आले.

मैदाने व मोकळया जागा भाड्याने दिल्यानंतर वापरकर्त्याकडून कार्यक्रम झाल्यानंतर तेथील स्वच्छता केली जाणे आवश्यक आहे. मात्र त्याबाबत वापरकर्त्याकडून दक्षता घेतली जात नाही अशा तक्रारी जागरुक नागरिकांकडून प्राप्त होताना दिसतात. याबाबत विभाग कार्यालयांनी सतर्क राहून परवानगी देतांनाच वापरकर्त्यांना याबाबत माहिती द्यावी व त्यांनी स्वच्छता न केल्यास त्यांच्या अनामत रक्कमेतून स्वच्छतेसाठी आलेल्या खर्चाची  कपात करावी असेही सूचित करण्यात आले. स्वच्छ व सुंदर शहर ही आपल्या नवी मुंबईची ओळख असून यामध्ये स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे कार्यक्रमानंतर तेथील स्वच्छता ही आयोजकांची जबाबदारी असल्याची जाणीव त्यांना करुन द्यावी व याबाबत दंडात्मक कार्यवाही करावी अशाही सूचना देण्यात आल्या.

नाले व धारण तलाव या नैसर्गिक गोष्टींची स्वच्छता ही अत्यंत महत्वाची बाब असून त्याकडे दूरगामी नियेाजनाच्या दृष्टीने पहावे व त्यानुसार नियोजनबध्द कारवाई करावी असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.

जगभरातील सध्याचे वातावरणातील वाढते प्रदूषण बघता यापुढील काळात स्मशानभूमीही सीएनजी गॅस अथवा वीजेवर चालणा-या असणे ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 29 स्मशानभूमीमध्ये टप्प्याटप्प्याने गॅस / विद्युत शवदाहिनी करणेबाबत कार्यवाही करावी व याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावे अशाही सूचना आयुक्तांनी केल्या.

रस्ते सुधारणांची कामे गुणवत्तापूर्ण करण्यावर भर देताना रस्ते विकासातून दळणवळण संपर्क वाढविणे, रत्यांचे अद्ययावतीकरण व रुंदीकरण करणे आणि त्यांची योग्यप्रकारे नियमित देखभाल व दुरुस्ती करणे या 3  बाबींकडे प्राधान्याने लक्ष द्यावे असेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. महानगरपालिकेमार्फत सुरु असलेली प्रकल्प बांधकामे कामांना वेग देऊन जलद व गुणवत्तापूर्ण करावीत तसेच महानगरपालिकेच्या प्रवेशव्दारांच्या कामांची पूर्तताही तत्परतेने व्हावी असे निर्देश देण्यात आले.

नागरिकांना मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्यासाठी फोन पे, जी पे सह आरटीजीएस तसेच सर्व प्रकारच्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. त्या सुविधांचा लाभ नागरिक महानगरपालिकेच्या कोणत्याही कार्यालयात न जाता घरबसल्या घेऊ शकतात तसेच त्यांना व्यवहाराची ऑनलाईन पावतीही मिळू शकते. तरी अद्यापही नागरिक मोठया प्रमाणात महापालिका कार्यालयात जाऊन देयक अदा करणे पसंत करतात. वास्तविकत: ऑनलाईन देयक रक्कम अदा करणे हे पारदर्शक व जलद कामकाजाच्या दृष्टीने नागरिकांना सोयीचे असून याबाबत नागरिकांपर्यंत अधिक व्यापक स्वरुपात माहिती  पोहचवून त्यांच्यामध्ये ऑनलाईन देयक अदा करण्याची सवय निर्माण करण्यासाठी जनजागृती करावी असेही आयुक्तांनी निर्देश दिले.

नवी मुंबई महानगरपालिका नागरिकांना सोयीचे होईल व त्यांच्या श्रम, मूल्य व वेळेत बचत होईल यादृष्टीने ऑनलाईन सेवा पुरविण्यावर भर देत असून महानगरपालिकेमार्फत 68 लोकसेवांसह महानगरपालिकेच्या आणखी 49  सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. देयक भरण्याच्या सर्व ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे नागरिक 8291920504 या व्हॉट्सॲप चॅट बॉटवरुनही सहजपणे सेवांचा लाभ घेऊ शकतात. त्या अनुषंगाने सर्व विभागांनी आपल्याशी संबधित सेवांची पूर्तता विहित कालावधीत करण्यासाठी कटीबध्द रहावे असेही निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले.