राज्यस्तरीय ख्याल गायन स्पर्धेत स्नेहल पाटील प्रथम

 राज्यस्तरीय ख्याल गायन स्पर्धेत स्नेहल पाटील प्रथम



पनवेल दि.१९(वार्ताहर): ‘पनवेल कल्चरल सेंटर’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या तिसाव्या राज्यस्तरीय शास्त्रीय ख्याल गायन स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच संस्थेच्या सभागृहात पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातून एकूण 24 स्पर्धकांनी भाग घेतला होता. पहिल्या फेरीसाठी स्पर्धकांकडून त्यांच्या पसंतीच्या कुठल्याही रागातील वीस मिनिटांच्या गायनाचे व्हिडिओज मागविण्यात आले होते. नंदकुमार कर्वे, मिलिंद गोखले आणि मधुरा सोहनी यांनी या गायनाचे परीक्षण करुन त्यातून 11 स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी केली होती.

           अंतिम फेरीच्या स्पर्धेचे परीक्षण डॉ. राम नेने आणि डॉ. अनया थत्ते यांनी केले. स्पर्धेनंतर स्पर्धकांना मार्गदर्शन करताना डॉ. राम नेने म्हणाले ‘अंतिम फेरीतील सर्वच स्पर्धक तयारीचे होते. आता व्यावसायिक गायक होण्याकडे तुमची वाटचाल सुरू व्हायला हवी ! गाणं सादर करताना तुम्ही इतरांपेक्षा काय वेगळं गाता हे महत्त्वाचे आहे आणि तेच श्रोत्यांना आकर्षित करतं. तर डॉ. अनया थत्ते म्हणाल्या, गाण्याचे दोन प्रकार आहेत एक स्वान्तसुखाय आणि दुसरे श्रोत्यांसाठी. श्रोत्यांसाठी गाताना गाण्यातून श्रोत्यांशी संवाद साधायला हवा. फक्त तालासुरात गाता येणे पुरेसे नाही, लयही अतिशय महत्त्वाची आहे. प्रत्येक रागाचं स्वतःचं एक सौंदर्य असतं ते गाण्यातून प्रगट व्हायला हवं ! तुम्हाला समजलेला राग तुम्ही श्रोत्यांसमोर कसा मांडता ते महत्वाचं आहे. गाण्याचा आनंद स्वत:ही घेतला पाहिजे आणि श्रोत्यांनाही देता आला पाहिजे. श्रोत्यांसाठी जेव्हा आपण गायन करतो तेव्हा श्रोत्यांच्या अपेक्षाही पूर्ण करण्याच्या जबाबदारीने गायन करायला हवं आणि स्पर्धेसाठी जर गायन करत असाल तर इतरांपेक्षा आपलं काहीतरी वेगळं गायनात असलं पाहिजे. पनवेल कल्चरल सेंटरच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष मिलिंद गोखले यांनी मान्यवर परीक्षकांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केल्यावर स्पर्धेतील विजेत्यांना परीक्षकांच्या हस्ते रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि सुरेश राव यांनी संपादित केलेल्या सलिल चौधरी यांच्यावरील पुस्तकाचा समावेश असलेली पारितोषिके देण्यात आली. दहा हजार रुपयांचे शैलजा तळेकर स्मृती प्रथम पारितोषिक स्नेहल पाटील हिने पटकावले तर सात हजार रुपयांचे  शुभदा मधुकर दशपुत्रे स्मृती द्वितीय पारितोषिक सिद्धार्थ गोडांबे यास मिळाले. पाच हजार रुपयांचे प्रभाकर आघारकर स्मृती तृतीय पारितोषिक निरंजन पेडगावकर यास तर चार हजार रुपयांचे विश्वास भिडे स्मृती उत्तेजनार्थ पारितोषिक मृण्मयी भिडे हिला देण्यात आले. याशिवाय या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झालेला सर्वात लहान स्पर्धक म्हणून अंशुल बोपर्डीकर याला तीन हजार रुपयांचे गोपाळकृष्ण राव स्मृती पारितोषिक देण्यात आले. मधुरा सोहनी यांनी स्पर्धा समिती प्रमुख म्हणून उत्तम नियोजन केले आणि त्यांना श्रीधर सप्रे, नंदकुमार कर्वे, चंद्रकांत मने, अजय भाटवडेकर, शशिकांत पाटील प्रभृतींची उत्तम साथ लाभली.फोटो: ख्याल गायन स्पर्धा