नवी मुंबई पालिकेची एमआयडीसी क्षेत्रातही रस्ते व दुभाजक येथे सखोल स्वच्छता मोहीम व धूळ नियंत्रणात्मक उपाययोजना
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नियमीत स्वच्छतेसोबतच वायू प्रदूषण प्रतिबंधात्मक मोहीमा प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत मुख्य रस्त्यांप्रमाणे एमआयडीसी क्षेत्रातील रस्त्यांचीही सखोल स्वच्छता केली जात आहे. यामध्ये रस्त्यांवरील माती ब्रशने तसेच फ्लपर मशिनने काढून ती वाहून नेण्यात येत आहे व रस्ते प्रक्रीयाकृत पाण्याने धुवून घेण्यात येत आहेत.
या अनुषंगाने आज घणसोली विभागात रबाळे एमआयडीसी भागामध्ये आज महानगर टेलिफोन निगम लिमिटेड समोरील मुख्य रस्त्यावर वृषाली हॉटेल ते कल्पना हॉटेल पर्यंतच्या रस्त्यावर सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये 30 स्वच्छताकर्मींचा समुह कार्यरत होता. त्यासोबतच याभागात एनकॅप वाहनाव्दारे हवेमध्ये कारंजासारखे पाण्याचे फवारे मारुन हवेतील धूळ कमी करण्यासाठी कार्यवाही करण्यात आली.
अशाच प्रकारची सखोल स्वच्छता मोहीम रबाळे येथे सिध्दार्थनगर ते फायबर कंपनी दरम्यानच्या रस्त्यावर राबविण्यात आली. या मोहीमांमध्ये रस्त्यांची स्वच्छता करुन माती संकलित करण्याप्रमाणेच रस्त्याच्या कडेला पडलेला बांधकामाचा व पाडकामाचा राडारोडा उचलून नेण्यात आला.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी 25 नोव्हेंबर रोजीच्या आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली, विभाग स्तरावर रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण उपाययोजना करण्यासाठी पथके तयार करण्यात आली असून विभाग अधिकारी तथा सहा.आयुक्त यांच्या माध्यमातून संबंधित विभाग कार्यालय क्षेत्रात दैनंदिन नियमीत करण्यात येणाऱ्या साफसफाई कामाच्या जोडीला हवेतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात येत आहेत.
