भगवदगीता आपल्या संस्कृतीचा आत्मा - आमदार प्रशांत ठाकूर
भारत बुद्धी, ज्ञान आणि मूल्यांचा देश - समीरा गुजर-जोशी
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल यांच्या वतीने श्रीगुरुकुलम् न्यासतर्फे सप्टेंबर महिन्यात श्री. विरुपाक्ष मंगल कार्यालय येथे "श्रीमद् भगवद् गीता पाठ महायज्ञ" संपन्न झाले. या संस्कारमय कार्यक्रमाच्या अनुषंगाने श्रीमद भगवद गीता पठण स्पर्धेची घोषणा आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. विशेष म्हणजे पनवेलमध्ये प्रथमच आयोजन करण्यात आलेल्या या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि समीरा गुजर - जोशी यांचे प्रकट व्याख्यान शहरातील गोखले सभागृहात झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते.
यावेळी प्रमुख वक्ता सुप्रसिद्ध अभिनेत्री व सूत्रसंचालिका समीरा गुजर - जोशी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, पनवेल मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, माजी नगरसेवक अजय बहिरा, राजू सोनी, प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका प्रिती जॉर्ज, सुलक्षणा टिळक, संस्कृत भारतीच्या अनया करंदीकर, नीलांबरी जोशी, जुई चव्हाण, गुरुकुलम न्यास अध्यक्ष मंजिरी फडके, ऍड. अमित चव्हाण, कामगार आघाडीचे प्रदेश सचिव संजय भगत, रुपेश नागवेकर, प्रितम म्हात्रे, विनायक मुंबईकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, युवा मोर्चा शहराध्यक्ष हिमेश बहिरा यांच्यासह विद्यार्थी, युवा, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय संस्कृतीच्या परंपरेत श्रीमद् भगवद्गीता हे ग्रंथरत्न विशेष मानाचे स्थान राखून आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेले गीतेतील उपदेश आजही मानवाला सत्य, कर्तव्य, धैर्य आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखवतात. या आध्यात्मिक ज्ञानाच्या प्रवाहाला नवे तेज देण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून काम केले जात आहे. ही स्पर्धा हा केवळ श्लोक पठणाचा कार्यक्रम नसून, विद्यार्थ्यांच्या अंतर्मनात संस्कारांची पेरणी करण्याचा एक सुंदर प्रयत्न असतो. योग्य उच्चारण, छंद, लय आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे गीतेचे श्लोक सादर करताना विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, स्मरणशक्ती आणि मानसशांती विकसित होते. गीता पठण हे प्राचीन भारतीय वाङ्मयातील संगीतात्मक परंपरेचाही एक भाग आहे. श्लोकांच्या ध्वनीत एक विशिष्ट लय असते, जी मनाला स्थिर ठेवते. त्यामुळे स्पर्धेची तयारी करताना केवळ श्लोक पाठ होतात असे नाही; तर त्यांना संस्कृत भाषेचे सौंदर्य, तिचे व्याकरण आणि ध्वनी माधुर्य यांचाही परिचय होतो. यामुळे त्यांची भाषिक आणि बौद्धिक प्रगती अधिक दृढ होते. त्यामुळे श्रीमद् भगवद्गीता चे महत्व अनन्य साधारण आहे. त्या अनुषंगाने पुढे बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी भगवद गीतेचे महत्व आपल्या भाषणातून मांडले. संस्कृत भाषा ज्ञानाची आणि संस्कृतीची आहे. आपल्या देशातील भाषा आणि साहित्य देशाचे वैभव आहे, त्या अनुषंगाने आपली संस्कृती वृद्धिंगत होत राहणे हि आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे नमूद करून भगवद गीतेचे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे हा मूळ उद्देश या स्पर्धेचे होते हे त्यांनी अधोरेखित केले. या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद ऊर्जा देणारा आहे.हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल आणि श्री गुरुकुलम न्यास यांनी विशेष मेहनत घेतली असल्याचे नमूद करून यापुढेही हि स्पर्धा अखंडपणे सुरु राहिली पाहिजे यासाठी आपण सारे कायम प्रयत्नशील राहू या, असे आवाहन करून स्पर्धक तसेच आयोजन समितीमधील सर्वांना त्यांनी धन्यवाद दिले.
यावेळी वक्ता म्हणून बोलताना समीरा गुजर-जोशी यांनी म्हंटले कि, आपली संस्कृती ही आपल्या ओळखीचा आत्मा आहे आणि ती कधीही विसरता कामा नये. भारत हा बुद्धी, ज्ञान आणि मूल्यांचा देश असून येथे शब्दांचे उच्चार, त्यांचा अर्थ आणि विचारांना विशेष महत्त्व दिले जाते. भारतीय संस्कृती जगभरात तिच्या महान परंपरा, तत्त्वज्ञान आणि जीवन मूल्यांमुळे ओळखली जाते. यशस्वी, संतुलित आणि अर्थपूर्ण जीवनासाठी भगवद्गीतेचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे. भगवद्गीतेत सांगितलेला कर्मसिद्धांत माणसाला कर्तव्यनिष्ठ राहून, फळाची अपेक्षा न करता कार्य करण्याची प्रेरणा देतो. हा सिद्धांत व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास आणि जीवनातील यशासाठी दिशादर्शक ठरतो. भारतीय संस्कृतीचे जतन आणि भगवद्गीतेतील विचारांचा अंगीकार केल्यास समाज अधिक सुसंस्कृत, विचारशील आणि मूल्याधिष्ठित बनेल, असे सांगून जो घटक संपूर्ण समाजाला एकत्र बांधून ठेवतो, मूल्ये, नैतिकता आणि एकोप्याची भावना निर्माण करतो, त्याला खऱ्या अर्थाने धर्म म्हणता येते, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी साने गुरुजी, विनोबा भावे, बहिणाबाई यांचे उदाहरणे देत भावी व युवा पिढीला सरळ सोप्या भाषेत संवादातून मार्गदर्शन केले. तसेच सांस्कृतिक दृष्टया महत्वाच्या या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभारही व्यक्त केले.
- विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे-
- खुला गट-
प्रथम क्रमांक - श्रुती संदीप विरकर
द्वितीय क्रमांक (विभागून)- निता लक्ष्मण भुजबळ आणि निवेदिता मधुकर नाईक
तृतीय क्रमांक - शैला शरदराव कन्नडकर
- शालेय गट-
इयत्ता ३ री व ४थी
प्रथम क्रमांक - भाविका ओमकार कुलकर्णी
द्वितीय क्रमांक - साई तुळशीराम गांडाळ
तृतीय क्रमांक - शिवम निवास डांगरकर
इयत्ता ५वी ते ७ वी
प्रथम क्रमांक - राधा अंबरीश सहस्रबुद्धे
द्वितीय क्रमांक - अथश्री जोशी
तृतीय क्रमांक - ईश्वरी कट्टी
इयत्ता ८ वी ते १०वी
प्रथम क्रमांक - परिभूषण कुलकर्णी
द्वितीय क्रमांक - आभा टिळक
तृतीय क्रमांक - विद्यारण्य सचिन गोंधळी
खुला गटातील प्रथम क्रमांकास २१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला १८ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास १५ हजार रुपये, तर शालेय गटातील इयत्ता ३ री व ४थी मधील प्रथम क्रमांकास ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ३ हजार रुपये तर तृतीय क्रमांकास २ हजार रुपये, इयत्ता ५वी ते ७वी मधील प्रथम क्रमांक ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला ८ हजार तर तृतीय क्रमांकाला ५ हजार रुपये तसेच इयत्ता ८वी ते १०वी मधील प्रथम क्रमांकास १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला ११ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाला ८ हजार रुपये असे बक्षिसांचे स्वरूप होते. त्याचबरोबर प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र, तसेच विजेत्याला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

