लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
पनवेल (प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७५ वर्ष पूर्तीनिमित्त अर्थात अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण वर्षभर समाजहिताचे विविध उपक्रम राबवण्याचा मोठा संकल्प करण्यात आला आहे. या संकल्पाला अनुसरून रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कूल येथील विद्यार्थ्यांनी समाजसेवेची सुंदर परंपरा जोपासत माऊली वेलफेअर वृद्धाश्रम नेरुळ व आदिवासी आश्रम शाळा चिरनेर येथे भेट देऊन एक आदर्श सामाजिक उपक्रम पार पाडला.
विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी व गरीब व गरजू विद्यार्थ्यांना धान्य, किराणा साहित्य, भाजीपाला, घरगुती आवश्यक वस्तू, स्वच्छता साहित्य, मेडिकल फर्स्ट-एड किट, औषधे, तसेच वस्त्र, उबदार शाल, मोजे, टॉवेल यांसारख्या वस्तूंचे मनापासून संकलन करून वितरण केले. बहुतेक साहित्य हे विद्यार्थ्यांनी स्वतः घरातून, बचतीतून किंवा स्वतःहून गोळा करून दिल्यामुळे या उपक्रमाला एक विशेष भावनिक स्पर्श मिळाला.वृद्धाश्रमात पोहोचताच विद्यार्थ्यांचे ज्येष्ठ नागरिकांनी प्रेमाने स्वागत केले. मुलांनी ज्येष्ठांशी संवाद साधला, त्यांचे अनुभव ऐकले आणि त्यांच्यासोबत काही काळ घालवल्याने वृद्धाश्रमात आनंद, उत्साह आणि आत्मीयतेचे वातावरण निर्माण झाले. अनेक ज्येष्ठ रहिवाशांनी भावूक होत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना भरभरून आशीर्वाद दिला.
या उपक्रमाबद्दल बोलताना मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर यांनी सांगितले की, “लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी संपूर्ण आयुष्य समाजकार्याला वाहिले आहे. त्यांच्या ७५ व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून समाजासाठी काहीतरी करण्याची शिकवण घ्यावी, हा आमचा उद्देश आहे. आजच्या उपक्रमामुळे मुलांमध्ये करुणा, संवेदनशीलता आणि सेवा यांची खरी भावना निर्माण होण्यास मदत झाली.या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक, व्यवस्थापन समिती यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे वृद्धाश्रमातील रहिवाशांना व आदिवासी विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्याचा मोठा आधार मिळाला. तसेच विद्यार्थ्यांची समाजाबद्दलची दृष्टी आणखी व्यापक झाली.

