महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
उरण दि १९(विठ्ठल ममताबादे )काळ १९७५ चा. त्यावेळी एक विद्यार्थी पाचवीला प्रवेश घेतो आणि १९८० ला दहावी उत्तीर्ण होतो. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी पनवेल येथील तत्कालीन आर्टस, सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालयात प्रवेश घेतो. बी. कॉमचा रिझर्ल्ट लागण्यापूर्वीच न्हावा यार्डमध्ये कामाला लागतो. पुढे तेथील कामगारांना न्याय देता देता कामगार नेता म्हणून नावारूपाला येतो आणि आता तर चक्क आंतरराष्ट्रीय कामगार नेते म्हणून जागतिक पातळीवर नावलौकिक कमावतोय- तोच १९७५ चा विद्यार्थी म्हणजेच आजचे महेंद्रशेठ घरत होय! हा सारा इतिहास सांगण्याचे कारण म्हणजे १९७५ ते १९८० दरम्यान श्री छत्रपती शिवाजी विद्यालय गव्हाण-कोपर येथे महेंद्रशेठ घरत यांना हायस्कूलमध्ये शिकताना पाया भक्कम करणारे बहुसंख्य शिक्षक हे सातारा परिसरातील आहेत. लोखंडे सर, लोखंडे बाई, ढाणे सर, गोरड सर हे त्यापैकीच. या सर्व शिक्षकांवर जिवापाड प्रेम करणारे, स्वतःच्या आई-वडिलांची जशी सेवा केली तशीच या शिक्षकांची आजही सेवा करणारे महेंद्रशेठ घरत हे खऱ्या अर्थाने आजही विद्यार्थी आहेत, हे त्यांनी आजपर्यंत त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे. महेंद्रशेठ घरत यांना हायस्कूलला शिकविणाऱ्या लोखंडे बाईंचे गेल्या वर्षी निधन झाले. गुरुवारी (ता.१८) त्यांची पहिली पुण्यतिथी होती. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्यासाठी महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या बिझी शेड्युलला फाटा दिला आणि थेट लोखंडे सरांच्या वाठार येथील घरी गेले होते. तेथे त्यांनी लोखंडे बाईंना विनम्र अभिवादन केले. तेव्हा लोखंडे परिवार भावुक झाला होता. आपला विद्यार्थी अनेक तास प्रवास करून अगदी वेळेवर आदरांजली वाहायला आलेला पाहून लोखंडे कुटुंबीय कृतकृत्य झाले होते.
महेंद्रशेठ घरत यांनी लोखंडे बाईंना आदरांजली वाहिल्यानंतर लोणंद येथे ७३ वर्षांच्या गोरड सरांची भेट घेण्यासाठी मोर्चा वळविला. महेंद्रशेठ यांना पाहून गोरड सर आणि त्यांच्या सहचारिणीला अत्यानंद झाला होता. यावेळी वयानुरूप थकलेले गोरड सर पाहून महेंद्रशेठ यांनी त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. त्यांना हाताला धरून चालविले, जुन्या आठवणींत रमले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण फुलविले. त्यानंतर महेंद्रशेठ घरत यांनी आपला मोर्चा पारडी येथील ढाणे सर यांच्याकडे वळविला. त्यांच्या कुटुंबात दुःखद घटना घडल्याने त्यांचे सात्वन केले. ढाणे सरांच्या नातवांशी संवाद साधताना ते बालपणात हरवले. महेंद्रशेठ घरत यांनी आपल्याला हायस्कूलमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकांच्या तिसऱ्या पिढीशीही हसतखेळत संवाद साधून शिक्षकांची मने जिंकली.
थोडक्यात आपल्याला शिकविणारे शिक्षक सेवानिवृत्त झाल्यापासून ते आजपर्यंत महेंद्रशेठ घरत यांनी गुरु-शिष्य हे नाते जपले आहे. "आमच्या घरची मंडळी जेवढी काळजी घेतात, त्यापेक्षा अधिक काळजी महेंद्रशेठ घेतात. वर्षातून वेळ मिळेल तेव्हा आमच्या घरी येऊन आमच्याशी संवाद साधतात, मदत करतात, तब्बेतीची चौकशी, तसेच विविध ठिकाणी पर्यटन घडवतात, ताज सारख्या हॉटेलात जेवायला नेतात, असे फक्त महेंद्रशेठच करू शकतात," असे महेंद्रशेठ घरत यांना शिकविणारे सातारा परिसरातील शिक्षक अभिमानाने सांगतात.
मात्र महेंद्रशेठ घरत अतिशय नम्रपणे म्हणतात, "आज जो कोणी मी आहे त्याची जडणघडण करणारे शिक्षक आहेत. या सर्व शिक्षकांमुळेच मी सन्मानाने समाजात वावरतोय. ही ताकद माझ्या सर्व शिक्षकांनी मला दिली, याची मला जाणीव आहे. त्यामुळे शिक्षकांना या वयात आधार आणि साथ देणे हे माझे कर्तव्य आहे. ते मी करणारच!"
एकंदरित शिक्षक आणि विद्यार्थी हे अनोखे नाते जपणारे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यामुळे आजच्या कलयुगात महेंद्रशेठ घरत यांचे शिक्षकांप्रती असणारे प्रेम हे जगावेगळे आहे, अशी चर्चा तत्कालीन विद्यार्थ्यांत होत आहे.

