समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा; राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती, प्रदेशाध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा

समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा; राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती, प्रदेशाध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा 






पनवेल (हरेश साठे)  समाजहिताची भूमिका समर्थपणे निभावणारे आणि कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस यंदाही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी आमदार प्रशांत ठाकूर यांनी वडील लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आई शकुंतला ठाकूर यांचे आशिर्वाद घेतले. त्यानंतर पनवेलमधील मार्केट यार्ड येथे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी गर्दी केली. 
          आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि मान्यवरांनी तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, कला, क्रीडा, प्रशासकीय, विधी, पत्रकारिता, वैद्यकीय, संगीत, नाट्य, सामाजिक संस्था, संघटना, विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी तसेच हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभिष्टचिंतन केले. 
       या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आले होते. आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहिमा, शैक्षणिक मदतवाटप, महिला सक्षमीकरण कार्यक्रम आदींचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांद्वारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी जनतेप्रती असलेली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली. वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल व सीकेटी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'महारोजगार मेळावा २०२५', भारतीय जनता पार्टी खिडूकपाडा, कामगार नेते प्रभुदासअण्णा भोईर व सुरेश भोईर यांच्यावतीने रुग्णसेवेसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा लोकार्पण, 'जाणीव एक सामाजिक संस्था' आणि 'सखी महिला मंडळ' यांच्या संयुक्त विद्यमाने 'आमदार चषक भव्य बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा', भारतीय जनता पार्टी प्रभाग १९ आणि जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्यावतीने मोफत आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर, भाजप रायगड जिल्हा सांस्कृतिक सेलच्यावतीने गदिमा आणि बाबूजींच्या अजरामर कार्याला मानवंदना असलेल्या 'ज्योतीने तेजाची आरती'  संगीतमय कार्यक्रम, जागृती फाऊंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर, खारघरचा राजा मंडळाच्या वतीने महाराणी पैठणीची कार्यक्रम, तसेच महिलांसाठी विविध स्पर्धा आणि साडी वाटप, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, नादब्रम्ह साधना मंडळ खारघर आणि पनवेल तालुका सांस्कृतिक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने 'शास्त्रीय व सुगम संगीत सुश्राव्य मैफिल, शिवतेज मित्र मंडळ व साबाई माता महिला मंडळ खारघरच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर, भारतीय जनता पार्टी कळंबोली यांच्यावतीने आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्रंथतुला तसेच सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम, माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे यांच्यावतीने धाकटा खांदा येथील शाळेत चित्रकला स्पर्धा, भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहराच्या वतीने लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय महानगरपालिका शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, खारघर स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे प्री इंटर स्कुल बास्केट बॉल स्पर्धा, गुड मॉर्निंग ४० प्लस आदई वलप विभाग व भाजप पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिकेट स्पर्धा, आरपीआयचे पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्यावतीने रक्तदान तसेच पॅनकार्ड व आधार कार्ड शिबीर, नवीन पनवेल येथे माजी नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्यावतीने विविध कामांचे लोकार्पण, आयुष्यमान भारत कार्ड वाटप आणि विद्यार्थ्यांना वह्या वाटप, भारतीय जनता युवामोर्चा प्रभाग क्रमांक १४ यांच्यावतीने स्वच्छता दूतांना रेनकोट व टिफिन वाटप, रत्नदिप स्पोर्ट्स क्लबच्यावतीने इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच शाळेतील विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या आयोजनातून सवलतीच्या दरात वॉटर फिल्टर, विकासकामांचे लोकार्पण, तसेच विविध मंडलात वृक्षारोपण अशी अनेक सामाजिक उपक्रम  कार्यक्रमे आयोजित करत वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमात साजरा करण्यात आला. 

सामाजिक भान जपणारा वाढदिवस 

राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक सामाजिक उत्सव घडवून आणला. भव्य जाहिराती, होर्डिंग-बॅनर यावर खर्च करण्याऐवजी त्यांनी कार्यकर्त्यांना सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत ठिकठिकाणी आरोग्य शिबिररोजगार मेळावेखेळ स्पर्धा, तसेच शालेय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यामुळे वाढदिवस साजरा होण्याच्या पारंपरिक चौकटीपलीकडे जाऊन हा दिवस एक सामाजिक योगदानाचा उत्सव ठरला. जनतेच्या प्रश्नांशी जोडलेपण, समाजोपयोगी दृष्टिकोन आणि विधायक उपक्रमांची निवड हे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाचे खास वैशिष्ट्य ठरते. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या वाढदिवसाने जनतेच्या मनात अधिक विश्वास निर्माण केला आहे.


चौकट- 

प्रिय प्रशांत जी,
वाढदिवसानिमित्त आपले मनःपूर्वक अभिष्टचिंतन !
पनवेल विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत असताना आपण दाखवलेला विकासात्मक दृष्टीकोन, समाजाभिमुख उपक्रम आणि लोकसहभागाला दिलेले प्राधान्य महत्त्वपूर्ण आहे. आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मतदारसंघाचा चेहरा बदलताना दिसत आहे, पनवेल परिसरात शहरी तसेच ग्रामीण विकासाला नवे परिमाण मिळताना दिसत आहे. सोबतच शहराचा विकास झपाट्याने होत असताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणासारख्या मोहिमेच्या माध्यमातून आपण घेतलेला पुढाकारही प्रशंसनीय आहे. सर्वसामान्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठीची आपली तळमळ आणि त्यासाठी आपण करत असलेला पाठपुरावा जनतेशी असलेली निष्ठा दर्शवणारा आहे. लोकप्रतिनिधींची दिनचर्या अत्यंत धावपळीची असते. मतदारसंघांची काळजी वाहत असताना आपण आपल्या आरोग्याचीही काळजी घ्याल, अशी आशा आहे. आपणास निरामयी दिर्घायुष्य लाभो व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो या सदिच्छेसह आपणास पुनःश्च वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.!- माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्य 

चौकट- 

नमस्कार, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... एक कार्यकुशल आणि विकासाभिमुख लोकप्रतिनिधी म्हणून आपण पनवेल विधानसभा मतदारसंघ आणि रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी उत्तम योगदान देत आहात. हे कार्य अशाच उत्तम प्रकारे यापुढेही सुरू रहावे; लोकसेवेचा आपला मार्ग उत्तरोत्तर अधिक प्रशस्त होत जावा आणि त्यासाठी सर्वशक्तिमान परमेश्वराने आपणांस आरोग्यसंपन्न, उत्साहपूर्ण, यशस्वी दीर्घायुष्य प्रदान करावे हीच आजच्या दिनी शुभकामना...- मा. श्री. राम शिंदे, सभापती- महाराष्ट्र विधान परिषद 

चौकट-

सर्वप्रथम वाढदिवसाच्या आपणास मनःपूर्वक शुभेच्छा. आपण एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी मिळाल्यावर मतदारांच्या अडचणी समजून त्या तातडीने सोडवण्यास आपण नेहमीच प्राधान्य दिले आहे. कामातील चिकाटी व प्रामाणिकपणाच्या जोरावर नागरिकांच्या मनात आपण वेगळी छाप टाकली आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी नवनवीन संकल्पनांच्या माध्यमातून आपण काम केले आहे. एखादे काम पूर्णत्वास नेण्यासाठीची आपली चिकाटी व जिद्द मी पाहिली आहे. मनमिळावू स्वभाव व कामाप्रती असलेली निष्ठा यामुळेच आपण जनसामान्यांच्या मनात आदराचे स्थान मिळविले आहे, ही कौतुकाची बाब आहे. आपल्या या कार्यामुळे मतदारसंघातील विकासाची गती आणखी वाढेल, असा विश्वास आहे.
आपला हा यशस्वी राजकीय प्रवास असाच निरंतर सुरु राहो, आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो या मनःपूर्वक शुभेच्छा ! -  मा. श्री. एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री- महाराष्ट्र राज्य 

चौकट- 

आपल्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! आपण पनवेल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना सामाजिक जाणिवेचे भान ठेवत लोकसेवेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहात. लोकशाही व्यवस्थेत जनतेचा प्रतिनिधी म्हणून कार्य करताना, लोकहिताला केंद्रस्थानी ठेवण्याची आपली भूमिका उल्लेखनीय आहे. आपले वडील, श्री. रामशेठ ठाकूर यांनी पनवेल परिसराच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा वारसा आपण समर्थपणे पुढे नेत आहात, ही बाब निश्चितच प्रशंसनीय आहे. आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि पुढील वाटचालीत जनतेच्या अपेक्षांना सार्थ ठरवणारे कार्य करण्याची ऊर्जा सदैव लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! 

मा. श्री. अजितदादा पवार -  उपमुख्यमंत्री- महाराष्ट्र राज्य