पनवेल बस डेपो येथे ४ नवीन एस.टी. बसेस चे लोकार्पण आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

पनवेल बस डेपो येथे ५ नवीन एस.टी. बसेस चे लोकार्पण आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

पनवेल/प्रतिनिधी,दि.२८- पनवेल बस डेपो हे महाराष्ट्रातील प्रमुख आणि मोठ्या बस आगारांपैकी एक मानले जाते. या ठिकाणी रोज अडीच हजारच्या वरती एस.टी. बसेसची ये-जा होत असते. आज नव्याने सुसज्ज अशा पाच एस.टी. बसेसचे लोकार्पण आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार विक्रांत पाटील यांनी बस डेपोच्या संपूर्ण परिसराची पाहणी सुद्धा केली. तसेच या बस डेपोचा रखडलेला विकास प्रकल्पास तात्काळ गती देणे संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चाही केली. बस डेपोचा हा अनेक वर्ष रखडलेला प्रकल्प तात्काळ मार्गी लागावा, याकरिता अधिवेशनात सुद्धा या विषयाची चर्चा आमदार विक्रांत पाटील यांनी घडवून आणली होती. तसेच परिवहन मंत्री मा. ना. प्रताप सरनाईक यांच्या दालनात या विषयाची एक विस्तृत बैठकही लावण्यात आली होती.

परंतु अजूनही या विषयात कामाला गती प्राप्त होत नाही, यामुळे आमदार विक्रांत पाटील यांनी या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्टेड करावे व B.O.T. तत्त्वावरती सुरू असलेल्या कामाच्या प्रकाराला रद्द करून थेट परिवहन खात्याकडून या बस डेपोचे विकासकाम केले जावे, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

B.O.T. तत्त्वावरती असलेल्या या विकास प्रकल्पाला उंचीच्या कारणास्तव पर्यावरण विषयाचा प्रलंबित असलेला न्यायप्रविष्ट मुद्दा यामुळे प्रकल्पाला तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या प्रकल्पाची उंची अधिक न वाढवता कमी उंचीत हा प्रकल्प बसवता येईल का? व हा प्रकल्प B.O.T. तत्त्वावर न करता शासनाकडून करून घेता येईल का? यासाठीचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार विक्रांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

या प्रकल्पासाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराने सुरुवातीपासूनच या कामाबाबतीत दिरंगाई दाखवली आहे व आता काही तांत्रिक अडचणी समोर आल्याने प्रकल्प अजूनच रखडत चालला आहे. या कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करावी व या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करावे, अशी मागणीही शासनाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चार बसेसचे लोकार्पण करताना त्यांनी सर्व प्रवाशांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व सर्व नागरिकांसाठी हक्काची वाटणारी लाल परी आज या सेवेमध्ये आणखी चार सुसज्ज बसेस दाखल होत आहेत व जनसेवेसाठी सज्ज होत आहेत, याबद्दल नागरिकांचे अभिनंदन केले.

या लोकार्पण कार्यक्रमास पनवेल आगार प्रमुख अश्विनी फाळके -खाबडे, पनवेल आगार वाहतूक प्रमुख ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी नगरसेवक मनोज भुजबळ, संजय पाटील, नारायण चव्हाण, इक्बाल नावडेकर व एसटी कर्मचारी बांधव व नागरिक उपस्थित होते .