नवी मुंबई महानगरपालिकेचे 366.80 कोटींचे विक्रमी करसंकलन
कर संकलनात योगदान देणाऱ्या करदात्यांचे महापालिकेकडून आभार; 1 जुलैपासून विलंब दंड लागू!
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ताकर विभागाने सन 2025-26 या चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीमध्ये 366.80 कोटींचे करसंकलन करून करसंकलनामध्ये महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये विक्रमी नोंद केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकाभिमुख उपक्रम राबविल्यामुळे व करसंकलनासाठी विविध पुढाकार घेतल्याने संकलनामध्ये विक्रमी वाढ झाली असून यामध्ये बचतगटांच्या महिला, मालमत्ताकर विभागाचे सर्व स्तरावरील अधिकारी व कर्मचारी आणि सर्वात महत्वाचे शहरातील जागरुक करदाते यांच्यामुळे करसंकलनाचा हा विक्रम साध्य झाला असून हे सर्वांचे यश असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले असून करदात्या नागरिकांचे आभार मानले आहेत.
* असा आला कर !
3,47,788 करदात्यांपैकी 1,00,587 एवढ्या करदात्यांकडून 366.60 कोटी करभरणा.
ऑनलाईन पध्दतीने 63,488 करदात्यांनी भरला तब्बल 220 कोटींचा कर (66%)
तिमाहीच्या शेवटच्या दिवशी तब्बल 90.84 कोटी कर संकलन.
करसंकलनामध्ये घरपोच बिलांचा महत्त्वाचा वाटा;
नेरूळ या वॉर्डमधून आली सर्वाधिक रू. 74.13 कोटी कर रक्कम.
तब्बल ९९,७०३ करदात्यांनी घेतला सामान्य करावरील 10% सवलतीचा लाभ
* मालमत्ताप्रकारातून असा आला आहे मालमत्ताकर !
शहरातील एकूण मालमत्ताधारकांपैकी मालमत्तेच्या प्रकारातून खालीलप्रमाणे एकूण मालमत्ताकराचे संकलन झाले आहे.
निवासी मालमत्ता - 33 टक्के
औद्योगिक मालमत्ता - 33 टक्के
व्यावयासिक मालमत्ता -23 टक्के
मिश्र व इतर मालमत्ता - 11 टक्के
* उद्दिष्टपूर्तीसाठी अभिनव उपक्रम!
सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने मालमत्ता करवसुलीचे 1200 कोटी रुपयांचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी महानगरपालिकेने नियोजनबद्ध पावले उचलली आहेत. चालू वर्षात बचतगटांच्या महिलांद्वारे बिलांचे घरपोच वाटप, मोबाईल ॲप्लिकेशनच्या साहाय्याने मालमत्ताधारकांच्या माहितीचे संकलन व अद्ययावतीकरण (KYC), मालमत्ताकर भरण्यासाठी डिजिटल पद्धतीचा स्वीकार, मालमत्ताकर बिल व्हॉट्सॲपवर मिळविण्यासाठी व्हॉट्सॲप चॅटबॉट आणि मालमत्ताकर बिलातील सामान्य करावरील 10% सवलत योजनेचा लाभ असे अभिनव उपक्रम राबवण्यात आले आहेत.
त्यासोबतच, करसंकलनामध्ये वृध्दी होण्यासाठी चालू वर्षी डेटा विश्लेषण, मालमत्ताधारकांच्या माहितीचे अद्ययावतीकरण व माहितीच्या आधारे प्रभावी जनजागृतीकरिता फॉक्सबेरी टेक्नोलॉजी.प्रा.लि यांची नेमणूक करण्यात आली. त्यांच्याद्वारे करण्यात आलेले विश्लेषण, करसंकलन अभियानाचे नियोजन, माहिती संकलनासाठी मोबाईल ॲप्लिकेशनची निर्मिती या बाबींनी करसंकलनामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे.
आगामी काळामध्ये थकबाकीदारांना मालमत्ताकर भरण्याच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी महानगरपालिकेने आता 1 जुलैपासून विलंब दंड (शास्ती) लागू करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार, ज्यांनी पहिल्या तिमाहीमध्ये आपल्या कराचा भरणा केला नाही अशा थकबाकीदारांवर 1 जुलैपासून प्रतिमहिना वाढणारा 2% विलंब दंड आकारण्यास सुरुवात होणार आहे.
* विक्रमी करसंकलनाच्या माध्यमातून करदात्यांनी पार पाडलेली जबाबदारी उल्लेखनीय – आयुक्त डॉ.कैलास शिंदे
शहराच्या विकासामध्ये प्रत्येक करदात्याचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याने भरलेल्या करातूनच शहराचा विकास होतो. शहराच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाचा वेळेवर भरलेला कर हा विश्वासाचा भाग आहे. पहिल्या तिमाहीत झालेल्या विक्रमी करसंकलनातून नवी मुंबईकरांनी दाखवलेली जबाबदारी निश्चितच उल्लेखनीय आहे. मात्र आता नियमानुसार 1 जुलैपासून विलंब दंड लागू होत आहे. त्यामुळे अनावश्यक दंड टाळण्यासाठी नागरिकांनी तात्काळ कर भरून विकासाच्या वाटचालीत भागीदार व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.