नवी मुंबईतील शाळाशाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी गिरवले योगसनांचे धडे
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेत आपापल्या शाळांमध्ये आयोजित योगविषयक विविध उपक्रम यशस्वी केले.
आजचा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन हा भारताचे पंतप्रधान ना.श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली देश पातळीवर सकाळी. 6.30 ते 7.45या कालावधीत संपन्न झाला. यानिमित्त झालेल्या योगसंगम सामुहिक योग प्रक्षेपणात सर्व शाळांनी सहभाग घेतला. त्यापूर्वी आदल्या दिवशी 20 जून रोजी केंद्रीय मंत्रालयाद्वारे दिलेल्या पोर्टलवर शाळांनी आपला सहभागही नोंदवला होता.
आजच्या योग दिनाच्या प्रसंगी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई शाळा स्तरावर शिक्षक, विद्यार्थी, पालक, स्वयंसेवी संस्था, शिक्षणप्रेमी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांचा मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष सहभाग दिसून आला.
काही उत्साही विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत घरून येताना योगासनांसाठी मॅटही आणल्याचे निदर्शनास आले. शाळांमध्ये झालेल्या या योगविषयक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रथमत: योगाचे महत्त्व समजून सांगण्यात आले. आरोग्याच्या दृष्टीने नियमित योगासन करणे हे शरीराला फायद्याचे असते याबाबत उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
योग दिनानिमित्त मार्गदर्शन करण्यासाठी शाळांमध्ये आलेल्या योगाच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांकडून प्राणायाम तसेच योग अभ्यासाचे विविध प्रकार प्रात्यक्षिकासहित करून घेतले. शरीर निरोगी राहण्याच्या दृष्टीने आपला आहार, विहार काय असावा, आपली दिनचर्या कशी असावी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
शाळेमध्ये दररोज होणाऱ्या शालेय परिपाठामध्ये पाच मिनिट मौन पाळणे तसेच विद्यार्थ्यांकडून प्राणायाम करून घेणे याची माहिती मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना दिली. पाऊण तास मार्गदर्शनानुसार प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या योगाभ्यासामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये अधिकच उत्साह जाणवत होता . अशाप्रकारे आजचा आंतरराष्ट्रीय योग दिन शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे यांच्या नियंत्रणाखाली नवी मुंबईतील शाळा स्तरावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला.