लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात महाविद्यालय विकास समितीची बैठक संपन्न

 लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात महाविद्यालय विकास समितीची बैठक संपन्न



पनवेल (प्रतिनिधी)  रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात आज महाविद्यालय विकास समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे विकास समितीचे प्रमुख व रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची तर ऑनलाईन प्रणालीने रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड.भगीरथकाका शिंदे यांची प्रमुख उपस्थितीत या बैठकीला लाभली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महाविद्यालय विकास व आर्टिफिशियल इंटेलिजन्स करिता ३० लाख रुपयाची देणगी जाहीर केली. यामुळे मोखाडातील विद्यार्थ्यांना एआय या आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली शिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. तसेच यावेळी आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शैक्षणिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा, असा ठराव महाविद्यालयाच्या विकास समितीने सर्वानुमते या बैठकीमध्ये एकमताने ठराव मंजूर केला. 
             या बैठकीला पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, संस्थेचे माध्यमिक शिक्षण विभागाचे सह सचिव बंडू पवार व संस्थेचे इतर पदाधिकारी, आश्रम शाळेचे प्रकल्प अधिकारी, प्र. प्राचार्य डॉ.ए. एन. चांदोरे, व महाविद्यालयाचा सर्व स्टाफ तसेच विकास समितीचे सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          सर्वप्रथम महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महाविद्यालयाची पाहणी केली.  त्यानंतर महाविद्यालयामध्ये सुरु असलेल्या रंगमंचाचे व प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील वेगवेगळ्या विकासात्मक कामाचे  निरीक्षण करून आवश्यक त्या पुढील सूचना दिल्या. यावेळी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने तारपा नृत्याचे विशेष आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग व वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. या आदिवासी भागातील विद्यार्थी पुढे जावा त्याच्या शिक्षणामध्ये सोयी सुविधा निर्माण व्हाव्यात. या दृष्टीने विचार करून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महाविद्यालय विकास व आर्टिफिशियल इंटेलिजन्स करिता ३० लाख रुपयाची देणगी जाहीर केली त्याबद्दल संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथकाका शिंदे व महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे विशेष आभार व्यक्त केले. तसेच या बैठकीमध्ये आदिवासी भागामध्ये आदरणीय रामशेठ ठाकूर यांचे विशेष शैक्षणिक योगदानाबद्दल महाविद्यालयाच्या विकास समितीने त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा यासाठी सर्वानुमते या बैठकीमध्ये एकमताने ठराव मंजूर करण्यात आला व सदर प्रस्ताव महाविद्यालयाच्या वतीने संस्था पातळीवर पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येणार आहे. सध्या महाविद्यालयामध्ये चालू असलेले वेगवेगळे उपक्रम व पुढील वाटचालीस महाविद्यालयाचे विकास समितीचे प्रमुख व ॲड. भगीरथ काका शिंदे साहेब यांनी शुभेच्छा दिल्या. या बैठकीचे आभार प्रा. एस. ए. फुंदे यांनी मानले