प्रबळगड माची येथे "योग विथ आमदार प्रशांत ठाकूर" उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल(प्रतिनिधी) जागतिक योग दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने पनवेलजवळील प्रबळगड माची या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळी आयोजित करण्यात आलेल्या “योग विथ आमदार प्रशांत ठाकूर” या विशेष उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, प्रांताधिकारी पवन चांडक, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह शेकडो युवक, महिला, स्थानिक नागरिक, तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दिनांक २१ जून २०१५ रोजी पहिला जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. योग साधनेतून मिळणाऱ्या अनन्यसाधारण लाभांमुळे योग जगात सर्वत्र लोकप्रिय झाला आहे. भारतीय ऐतिहासिक परंपरेचा अमूल्य ठेवा म्हणजे योग आहे, जो भारताने पूर्ण विश्वाला प्रदान केला आहे. त्या अनुषंगाने योग दिनाचे महत्व लक्षात घेता माची प्रबळगड येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आरोग्य सेवा समिती पनवेल यांच्यावतीने मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. योग केंद्र प्रमुख सूर्यकांत फडके यांनी योग संदर्भात मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिके सादर केली. त्यांच्यासमवेत सहाय्यक शिक्षक नैना म्हात्रे, प्रसाद गोडांबे, भारती गोडांबे यांचाही सहभाग होता. प्रबळगड माची, सह्याद्रीच्या कुशीत वसलेले, निसर्गाच्या सान्निध्यातील एक शांत आणि ऊर्जादायी जागा आहे. येथे योगाभ्यास करताना शरीर आणि मन दोघांनाही नवचैतन्य मिळते. ऐतिहासिक ठिकाणी योगसाधना करताना निसर्गाशी नाते जपण्याची, आणि आत्मिक शांतता अनुभवण्याची संधी मिळते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने प्रबळगड माची येथे सुरू झालेला हा उपक्रम एक परंपरा बनला असून, आरोग्य, युवक सशक्तीकरण आणि सांस्कृतिक जतन याला वाहिलेला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही योगप्रेमींना एकत्र आणून शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये विविध योगासने, श्वसन तंत्रे आणि ध्यानधारणा यांचे सत्र पार पडली.
यावेळी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, पनवेल पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, विचुंबे ग्रामपंचायत सरपंच प्रमोद भिंगारकर, किशोर सुरते, शिवकर ग्रामपंचायत सरपंच आनंद ढवळे, माजी सरपंच संगिता भुतांबरा, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, केदार भगत, राकेश भुजबळ, रोहित जगताप, चिन्मय समेळ, मयूर कदम, तेजस जाधव, देवांशु प्रबाळे, अक्षय सिंग, विवेक होन, शुभम कांबळे, यांच्यासह अनेक पदाधिकारी व निसर्गप्रेमी सहभागी झाले होते. मागील काही वर्षांमध्ये झालेल्या योग प्रचाराचा आढावा घेतला असता, योग प्रशिक्षणाची मागणी सर्वत्र वाढत आहे, योग कडे बघण्याचा शास्त्रीय दृष्टीकोन वाढीस चालला आहे. सर्व जगाला जोडण्याची ताकद योग शास्त्रामध्ये आहे, भारतीय परंपरेने आपल्याला प्राप्त झालेल्या या शास्त्राचा आदर करून, याचे आपल्या दैनंदिन आयुष्यातील महत्व ओळखून योग जीवन शैली आयुष्यात प्रत्यक्षपणे आणण्याचा प्रयत्न केला जात असून त्याचा जगभरात प्रचार आणि प्रसार करण्याचे काम होत आहे.