नमुंमपा नगररचना विभागात नियुक्तीसाठी स्थापत्य अभियंत्यांना द्यावी लागणार परीक्षा
नवी मुंबई (प्रतिनिधी)-नवी मुंबई महानगरपालिकेमधील अधिकारी, कर्मचारी यांच्या पदस्थापना व बदल्यांमध्ये अधिक पारदर्शकता व सूसुत्रता येण्यासाठी तसेच प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने व सर्वसमावेशक न्याय्य कामकाजाचे वाटप होण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेमार्फत धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली जात आहे. त्या अनुषंगाने आयुक्तांनी सर्व संवर्गाच्या बदल्यांसाठी नागरी सेवा मंडळाची स्थापना केलेली आहे.
*याकामी अधिक सूसुत्रता येण्याच्या दृष्टीने आता स्थापत्य सेवेतील अभियंत्यांची बदली नगरचना विभागात करताना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर नियुक्तीसाठी परीक्षा नियम 2025 लागू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त महोदयांनी घेतलेला आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवेतील कार्यकारी अंभियंता, उप अभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता या संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांना नगररचना विभागात पदस्थापना अथवा बदलीने नियुक्तीसाठी परीक्षा द्यावी लागणार आहे.*
नवी मुंबई महानगरपालिकेतील स्थापत्य अभियांत्रिकी सेवेतील अभियंत्यांसाठी नगररचना विभागात पदस्थापना / बदलीने नियुक्तीसाठी परीक्षा घेण्याबाबतच्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (सन 1949 चा मुंबई अधिनियम क्रमांक-59) च्या कलम-457 (3) (अ) व (ब) तसेच कलम-465, पोटकलम (1) खंड (ल) च्या तरतुदींनुसार त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका सेवा(सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, 2021 मधील सर्वसाधारण नियम-8 अन्वये परीक्षा नियम, 2025 जारी करण्यात येत असून त्यानुसार नगररचना विभागात पदस्थापना / बदलीने नियुक्तीसाठी परीक्षा देणे आवश्यक राहील.
महानगरपालिकेचा स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या तसेच नगररचना विभागाच्या आकृतीबंधास व सेवा प्रवेश नियमावलीस शासन मान्यता लाभलेली असून प्रत्येक विभागात स्थापत्य अभियंत्यांची पदसंख्या निश्चित आहे. स्थापत्य सेवेतील अभियंता हे सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग (पाणीपुरवठा / मलनि:स्सारण), विभाग कार्यालये, मालमत्ता विभाग तसेच नगररचना विभाग येथे कार्यरत आहेत. या विभागांमध्ये कार्यरत स्थापत्य - कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता यांना नगररचना विभागात पदस्थापना / बदलीने नियुक्तीकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेप्रमाणे परीक्षा घेण्यात येणार आहे.
यामुळे स्थापत्य अभियंत्यांच्या अनुभवाचा लाभ नगररचना कार्यात होईल तसेच सर्वांना संधी मिळून कामकाजाचे न्याय वाटप होईल. आयुक्त महोदयांच्या या निर्णयामुळे स्थापत्य अभियंता अधिकारी- कर्मचारीवृंदाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.