नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नावाबाबत राजकारण्यांचे गौडबंगाल काय ?-महेंद्रशेठ घरत

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नावाबाबत राजकारण्यांचे गौडबंगाल काय ?-महेंद्रशेठ घरत





जावळे ग्रामस्थांतर्फे महेंद्रशेठ यांचा सत्कार



उरण दि १०(प्रतिनिधी) -"देवाचे कार्य म्हणजे आपले कार्य, कर्ता करविता तोच आहे, तोच मालक आपल्या यशाचा, आपण तर रिकाम्या हाताने आलोय, रिकाम्या हातानेच जाणार आहोत. देवाच्या कामासाठी कधीही मागेपुढे पाहणार नाही. जावळे, शेलघर ही दोन्ही गावे दिवंगत भगत साहेबांपासून आम्ही एकच समजतो. जावळे गावातील विद्यार्थी १९७०-१९८० पर्यंत शेलघरच्या जिल्हा परिषद शाळेत येत होते. ते सारे आमचे वर्ग मित्र होते. त्यामुळे निश्चित इतर गावांपेक्षा जावळे ग्रामस्थांबाबत जास्त आत्मियता आहे. त्यामुळे जावळे ग्रामस्थांसाठी मी मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतो. जावळे गावाला मैदान, तलाव, समाज मंदिर आदी नागरी कामांसाठी पाठपुरावा होणे गरजेचे आहे. कोणीही आमदार, खासदार असला तरी ते निवडणुकीपुरते असतात.फक्त मतांसाठी असतात.दि. बा. पाटील यांच्यानंतर प्रकल्पग्रस्तांना आधार राहिलेला नाही, म्हणून त्यांचे कार्यकर्ते म्हणून सदैव प्रयत्नशील असतो. दि. बा. पाटील यांचा संघर्ष जिवंत असेपर्यंत संपला नव्हता, आज विमान उडण्याची वेळ आली तरी त्यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जात नाही, हे राजकारण्यांचे काय गौडबंगाल आहे. अद्याप नावाची घोषणा न होणे, हे प्रकल्पग्रस्तांचे दुर्दैव आहे. त्यामुळे मुंबई, दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना परमेश्वर सद्बुद्धी देवो आणि दिबांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावे अशीच सत्यनारायण पूजेनिमित्त प्रार्थना करतो असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत जावळे येथे म्हणाले.

आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काॅंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत ही खूप मोठी शक्ती आहे. हे फार कमी लोकांना माहिती आहे, जिथे जिथे मंदिर तिथे तिथे त्यांचा खारीचा वाटा आहेच, हे मी अभिमानाने सांगेन. प्रकल्पग्रस्त आणि विमानतळबाधित गावांच्या मंदिरांसाठी एक कोटी रुपयांचा निधी मिळवून देण्यात महेंद्रशेठ घरत यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणूनच आज स्थलांतरित गावांची मंदिरे भव्यदिव्य होत आहेत, असे मो. का. मढवी गुरुजी यांनी जावळे येथे म्हणाले.

शेतकरी, कामगार प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दि. बा. पाटील यांच्यानंतर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर असणारे आंतरराष्ट्रीय कामगार नेते रायगड नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च, वैद्यकीय मदत, गरिबांना घरे, मंदिरे, हरिनाम सप्ताह, पायी दिंडी वा इतर कामांसाठी अनेक जण 'सुखकर्ता' मंदिरात येतात. त्यांना सर्व प्रकारची मदत दानशूर नेते महेंद्रशेठ करतात. जावळे गावातील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार २० वर्षांपूर्वी झाला, त्यावेळीही महेंद्रशेठ यांनी सढळ हस्ते मदत केलीच, शिवाय मंदिर ट्रस्ट रजिस्ट्रेशन सुद्धा स्वखर्चाने केले. मंदिराचे काम अंतिम टप्प्यात असताना काही अडचणी आल्या, त्या सोडवून जावळे हनुमान मंदिराचे काम पूर्ण केले. साहजिकच दिवंगत तुकाराम कडू व ग्रामस्थांनी त्यावेळी महेंद्रशेठ घरत यांचा सत्कार केला होता. आज दुसऱ्या पिढीने पुन्हा एकदा महेंद्रशेठ यांना साकडे घातले, मंदिरात पावसाळ्यात पाणी येतेय, त्यामुळे तत्काळ पाच लाख रुपये खर्च करून महेंद्रशेठ घरत यांनी ते काम पूर्ण केले, असे जावळे ग्रामस्थांनी सांगितले.

यावेळी महेंद्रशेठ घरत यांचा जावळे ग्रामस्थांच्या वतीने मंदिरासाठी सहकार्य केल्याबद्दल यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी कृष्णा कडू, अनंता घरत, रमेश घरत, अण्णा कडू, जगदीश ठाकूर, अरुण घरत आणि मोठ्या प्रमाणात जावळे ग्रामस्थ उपस्थित होते.