खारघरमधील वाईन शॉपविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांचे राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांना निवेदन

 

खारघरमधील वाईन शॉपविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांचे राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांना निवेदन



पनवेल (प्रतिनिधी)खारघर येथील सेक्टर ६ मध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या गोल्डन कॉईन वाईन मार्ट या वाईन शॉप विरोधात खारघरमधील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, या वाईन शॉप विरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांना निवेदन सादर केले. निवेदन देताना आमदार ठाकूर यांच्यासोबत भाजपचे खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, डॉ. वैभव बदाणे, त्रिवेणी सालकर, किर्ती मेहरा, संतोषी चौहान, जुमा चक्रवती, कॅ. कलावत, तुकाराम कंठाले, संदीप पाटील, मोहन म्हात्रे, शैलेंद्र त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते.

        यावेळी आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले की, खारघरमध्ये नागरिकांनी सुरुवातीपासून दारू दुकाने व बारला कायम विरोध दर्शविला आहे. दारूबंदी संदर्भात  अनेक आंदोलने, निदर्शने या आधीही झाली असून, 'संघर्ष संस्था, खारघर' या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खारघरला दारूमुक्त शहर घोषित करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, संबंधित वाईन शॉपसाठी स्थानिक सोसायटी किंवा पनवेल महानगरपालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता व्यवसाय सुरू केल्याचे नागरिकांच्या म्हणण्यातून निदर्शनास आले आहे. त्यामुळे या वाईन शॉपला जर परवानगी दिली गेली असेल, तर ती त्वरित रद्द करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. खारघर परिसरातील शिक्षणप्रधान वातावरण लक्षात घेता, दारू दुकाने बार येथील सामाजिक रचनेला बाधा पोहोचवू शकतात, त्यामुळे एज्युकेशन हब म्हणूनच खारघर शहराची ओळख कायम रहावी, यासाठी सर्व खारघर वासियांचा आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमचा दारुबंदीला पाठिंबा, असेही अधोरेखित करण्यात आले.