हवाई सुंदरी मैथिली पाटीलला शेवटचा निरोप; अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
१२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला होता, ज्यात २७४ लोकांचा दुर्दैवी अंत झाला. या मृतांमध्ये मैथिली पाटील चाही समावेश होता. मैथिली ही गेल्या दोन वर्षांपासून एअर इंडियामध्ये हवाईसुंदरी म्हणून कार्यरत होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत तिने आपले हवाईसुंदरी होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. तिच्या या यशाने अनेकांना प्रेरणा मिळाली होती. विमान दुर्घटनेची बातमी कळताच तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. मैथिलीच्या पार्थिवाच्या निश्चितीसाठी डीएनए चाचणी करावी लागली. मंगळवारी सकाळी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे मैथिलीच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गाव तिच्या आठवणीत हळहळ व्यक्त करत आहे.
मैथिली पाटील हिचा अपघाती मृत्यू ही केवळ तिच्या कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर संपूर्ण गावासाठी, आणि हवाईसेवेतील तिच्या सहकाऱ्यांसाठीही एक मोठी दुःखद घटना आहे. एका ग्रामीण भागातून संघर्ष करत, आपल्या कष्टाच्या जोरावर हवाईसुंदरी होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करणे हे खरंच प्रेरणादायी होते. “संकटांशी झुंज देत, आकाशाला गवसणी घालणारी मैथिली आज आमच्यात नाही, यावर विश्वास बसत नाही. तिचं तेजस्वी हास्य, तिचं संघर्षमय आयुष्य आणि तिने मिळवलेली यशोगाथा ही कायम आमच्या आठवणीत जिवंत राहील. सर्व ग्रामस्थ आणि आम्ही मैथिलीच्या कुटुंबाच्या पाठीशी कायम राहू, अशी प्रतिक्रिया आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी श्रद्धांजली अर्पण करताना दिली.