विशेष लेख - आषाढीवारी 2025..! ; मानाच्या पालख्या, वारकरी अन् भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट-2025
पंढरपूर येथील आषाढी वारी ही महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाची आणि जुनी परंपरा आहे. ही वारी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असून विठ्ठल भक्तांसाठी खूप पवित्र मानली जाते. आषाढ शुद्ध एकादशीला (आषाढी एकादशी) पंढरपूर येथे ही वारी भरते. या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि परराज्यातून लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. पांडुरंगाच्या भेटीची आस घेवून वारकरी अनेक मैल पायी चालतात.
महाराष्ट्रातील विविध संतांच्या पालख्या (दिंड्या) त्यांच्या मूळ गावांपासून पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या पालख्यांसोबत हजारो वारकरी विठ्ठलाचा गजर करत, भजन-कीर्तन करत चालतात.
आषाढी वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नसून, ती महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक एकजुटीचे प्रतीक आहे. या वारीतून समानता, भक्ती आणि शांततेचा संदेश दिला जातो. जाती-धर्माचे भेद विसरून सर्व वारकरी एकत्र येतात. पंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा एक महत्त्वाचा भाग असून लाखो वारकऱ्यांसाठी एक आध्यात्मिक अनुभव आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक आहे.
आगामी सन 2025 च्या आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसेच भाविकांच्या व वारकऱ्यांसाठीच्या सोयी-सुविधा, त्यांच्या वाहनांना पथकरातून सूट देणे, तसेच वारी मार्गावरील रस्ते दुरुस्ती या विषयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दि.28 मे 2025 रोजी बैठक संपन्न झाली.
या बैठकीमध्ये खालीलप्रमाणे चर्चा होऊन मुख्यमंत्री महोदयांनी विविध विभागांना त्या अनुषंगाने सूचना व निर्देश दिले आहेत, त्यास अनुसरुन सर्व संबंधितांना सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पुढीलप्रमाणे सूचना करण्यात आल्या आहेत. यानुषंगाने शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.
1. पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, भाविक व वारकऱ्यांना “आषाढी एकादशी 2025”, गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करुन आवश्यक त्या संख्येनुसार स्टीकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस पोलीस, संबंधित आर.टी.ओ. यांच्याशी समन्वय साधून पोलीस स्टेशन्स, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. ऑफिसेस मध्ये उपलब्ध करुन द्यावेत.
पंढरपूरला जातेवेळी व परत पंढरपूरहून येतेवेळी दि.18 जून 2025 ते दि.10 जुलै 2025 या कालावधीत ही सवलत पालख्या, भाविक व वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठीच असेल, अशा सूचना दिल्या आहेत. तसे स्टीकर्स/ पास वर नमूद करण्यात यावे. हे पास परतीच्या प्रवासाकरिता ग्राह्य धरण्यात येतील याप्रमाणे स्टीकर्स तयार करण्यात यावेत. (नमूना सोबत जोडला आहे.) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सर्व पोलीस अधिकाऱ्यांना गृह विभागामार्फत अवगत करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
2. सर्व पथकर नाक्यावर स्वतंत्र पोलीस यंत्रणा ठेवावी. तसेच परिवहन विभागास देखील जादा बसेस गाड्या सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीकोनातून HSP (Highway Security Patrolling) मार्फत पथकर नाक्यांजवळ पोलिसांची व्यवस्था करावी, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC), डेल्टा/ MSSC (Maharashtra State Security Council) फोर्स जास्त संख्येने तैनात करण्याचेही निर्देश दिले आहेत.
3. आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच राज्यातील इतर सर्व संबंधित रस्ते / महामार्गावर रुग्णवाहिका व क्रेनची व्यवस्था करण्यात यावी. मुंबई-कोल्हापूर-बंगलोर, पुणे-सोलापूर, इ. राष्ट्रीय मार्गावर सुद्धा क्रेनची व्यवस्था करण्याचे निर्देश MSRDC: NHAI, PWD च्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना त्वरीत कळविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
4. तसेच गरज पडल्यास सुरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी जड वाहनास आवश्यक असल्यास बंदी घालण्याबाबत परिवहन विभागाने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
5. राज्यभरातून पंढरपूरला जाणारे रस्ते (उदा. मुंबईमधील सायन ते पनवेल महामार्ग, मुंबई-पुणे दुतगती मार्ग, मुंबई-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग, पुणे-सोलापूर, पुणे-सातारा-कोल्हापूर ते राज्य सीमेपर्यंतचा महामार्ग, इ. महामार्ग तसेच मुंबई-पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग व मुंबई-पुणे-सोलापूर राष्ट्रीय मार्गाला जोडणारे नवीन राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते, इ.) या सर्वांचे खड्डे भरणे, दुरुस्ती कामे, सूचना फलके लावणे इत्यादी कार्यवाही त्या त्या कार्यान्वयीन यंत्रणांनी (सा.वा. विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग, NHAI, इ.) करावीत.
6. या कालावधीत रस्ता सुस्थितीत आणण्याची कामे राष्ट्रीय महामार्ग विभाग व NHAI ने तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले आहेत.
7. दर 20-25 कि.मी. अंतरावर पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, इ. यंत्रणांनी संयुक्तिक रुग्णवाहीका, रस्ते खड्ढे भरण्यासंबंधी मटेरीअल, केन, इ. व्यवस्था ठेवावी. तसेच बऱ्याच महामार्गावर रस्ते सुधारण्याचे काम प्रगतीपथावर आहेत, अशा कामांवर वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सर्व संबंधित महामार्ग प्राधिकाऱ्यांनी आवश्यक ती उपाययोजना करावी.
8. महाराष्ट्र राज्यातून पंढरपूरकडे येणारे सर्व पथकर नाक्यांवर या कालावधीत पथकर माफी नसलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकरातून सूट द्यावी, असे ठरले व राज्य परिवहन (S.T.) विभागाच्या अधिकाऱ्यांनी गरजेप्रमाणे संबंधीत पोलीस ठाणे, इ. कडे या अनुषंगाने कूपन / पास प्राप्त करुन घ्यावेत.
राज्यभरातून पंढरपूरला जाणारे भाविक, वारकरी तसेच पालख्यांच्या वाहनांना संबंधित जिल्ह्यातील व शहरातील सर्व पोलीस ठाणे व वाहतुक विभाग/ शाखा/ चौकी येथून भाविकांचे मागणीप्रमाणे पथकर माफ (टोल फ्री) पासचे वाटप करण्यात यावे.
9. ग्रामीण पोलीस / आर.टी.ओ. यांच्यामार्फत दिले जाणारे कुपन्स / पावती यांची संख्या बाबतीत एकत्रित माहिती संबंधित महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास / सा. बां. विभागास/ NHAI कार्यालये यांना माहितीकरीता सादर करावी. जेणेकरून भाविक व वारकरी वाहनांना पथकरातून सवलत दिल्यानंतर संबंधित उद्योजकांना State Budget मधून नुकसान भरपाई देण्यात येईल.
10. नाक्यांवर वाहतूक कोंडी होवू नये यासाठी जास्तीत जास्त मनुष्यबळ, ट्रॅफिक वार्डन व हँड होल्डिंग मशीन ठेवण्यात यावेत, ज्यामुळे या कालावधीत पथकर नाक्यांवर वाहतूक कोंडी होणार नाही. याबाबत सर्व संबंधित महामार्ग प्राधिकारी, पथकर कंत्राटदार यांनी कार्यवाही करावी.
11. पथकर कंत्राटदारांनी संबंधीत रस्त्याच्या क्षेत्रात / परिसरात वाहतूक पोलिसांसाठी आषाढी एकादशीच्या काळात जादाचे ट्रॅफिक वॉर्डन डेल्टा किंवा एम.एस. एस. फोर्स उपलब्ध करुन द्यावेत.
12. पोलीस व परिवहन विभागाने आषाढी एकादशीच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती जनतेस होण्याकरिता आवश्यकतेप्रमाणे अधिसूचना/ जाहीर प्रसिध्दी करावी.
मनोज सुमन शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी,
ठाणे