स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन
भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची लाभणार प्रमुख उपस्थिती
"स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा; चिंध्रण ग्रामपंचायत सर्वोत्कृष्ट
पनवेल(प्रतिनिधी) पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती, कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या ३७ व्या पुण्यतिथी निमित्ताने ०७ मे २०२५ रोजी सायंकाळी ०६ वाजता उलवे नोड मध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि. ०३) येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये विशेषत्वाने पनवेल तालुकास्तरीय "स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा २०२५"चे बक्षिस वितरण तसेच शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणिजनांचा पारितोषिक सन्मान समारंभ त्याचबरोबरीने "मराठी पाऊल पडते पुढे" या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस आमदार प्रशांत ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, कार्यकारी मंडळ सदस्य संजय भगत, भाजपचे नेरे मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले कि, स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी अहोरात्र आपला देह 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' या तत्त्वाच्या पूर्ततेसाठी कारणी लावला. तळागाळातल्या लोकांबदल त्यांना विशेष प्रेम होते. दारिद्रय व भूक यांच्याबद्दल अगदी मनापासून तळमळ होती. तळागाळातील समाजाचा उद्धार फक्त शिक्षणामूळेच होऊ शकते हे त्यांनी जाणले होते. आपली दूरदृष्टी, अविश्रांत श्रम, चिकाटी, धडाडी त्याचबरोबर व्यापक समाजहिताची तळमळ ही उदात्त भावना स्व. जनार्दन भगत साहेब यांच्या अंतःकरणात कायम होती. जनार्दन भगत साहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट राहिले असून त्यांनी अहोरात्र लोकांची सेवा केली. आयुष्यापेक्षा ध्येय्य मोठे असले पाहिजे, ही शिकवण त्यांनी समाजामध्ये रुजवत फक्त राजकारण नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्याचबरोबर देवदूताची भूमिका सुद्धा पार पाडत त्यांनी समाजाला न्याय दिला आहे. लोकनेते दि. बा. पाटील यांचे उजवे आणि डावा हात म्हणून जनार्दन भगत साहेब आणि दत्तूशेठ पाटील यांना ओळखले जायचे. जनार्दन भगत साहेबांच्या आशीर्वादामुळे शिक्षण संस्थेची स्थापना झाली. त्यांचे कार्य सर्व समाजासाठी होते, त्यामुळे त्यांची स्फूर्ती नव्या पिढीला कायम मिळावी यासाठी या सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात असल्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अधोरेखित केले.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी माहिती देताना सांगितले कि, स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी केलेले कार्य सर्व समाजाचे हितकारक होते. त्यांच्या कार्यातून या भूमीला सामाजिक राजकीय ताकद मिळाली. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार या वर्षीही देण्यात येत आहे. त्यानुसार तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या स्वच्छतेच्या निकषावर सर्वेक्षण करण्यात आले असून "स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अर्थात प्रथम क्रमांक चिंध्रण ग्रामपंचायतीने पटकाविले आहे. त्यांना १ लाख रुपये व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. , द्वितीय क्रमांक विचुंबे ग्रामपंचायत, तृतीय क्रमांक गव्हाण ग्रामपंचायत तर उत्तेजनार्थ पारितोषिक करंजाडे व तुराडे ग्रामपंचायतीने मिळविले आहे. द्वितीय क्रमांकाला ५० हजार रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकाला २५ हजार रुपये व सन्मानचिन्ह तसेच दोन उत्तेजनार्थ ग्रामपंचायतींना प्रत्येकी ११ हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच नुकताच शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या स्वस्तिका घोष हिचा सन्मान करण्यात येणार असून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणिजनांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने 'देवकी मीडिया' प्रस्तुत व 'कलारंजना मुंबई' निर्मित, उदय साटम संकल्पित आणि दिग्दर्शित "मराठी पाऊल पडते पुढे" हा १०१ कलावंताचा संच असलेल्या कार्यक्रमाचा ४६०० वा प्रयोग सादर होणार आहे, अशीही माहिती देत या कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले.
०७ मे रोजी सायंकाळी ६ वाजता उलवा नोडमधील रामशेठ ठाकूर मैदान येथे हा पुण्यतिथी व सत्कार समारंभ कार्यक्रम होणार असून या समारंभाला प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती लाभणार असून समारंभ अध्यक्ष जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, मंडळाचे सचिव परेश ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, कार्यकारी मंडळ सदस्य अनिल भगत, प्रकाश भगत, संजय भगत, सभासद वसंत पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार असल्याची माहिती जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांनी दिली. भगतसाहेबांचे कार्य अफाट राहिले आहे. त्यांनी आमच्या विभागावर मोठे उपकार केले आहेत. भगतसाहेबांनी कुटुंबाला नाही पण समाजाच्या हितासाठी आयुष्य खर्च केले. बेळगाव सीमा प्रश्नावर एक वर्ष त्यांनी जेल भोगली आहे. त्यांचा त्याग आणि त्यांची स्मृती कायम राहावी यासाठी अशा कार्यक्रमांचे नियमित आयोजन करण्यात येत असल्याचेही वाय. टी. देशमुख यांनी नमूद केले.