पनवेल महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन
*जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविणार*
पनवेल, दि. १४: राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे दिनांक १४ एप्रिल २०२५ पासून अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या हस्ते आज कळंबोली येथील अग्निशमन केंद्रात करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी उपायुक्त कैलास गावडे, मुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडखे, अग्निशमन अधिकारी हरिदास सुर्यवंशी, उप अग्निशमन अधिकारी संदीप पाटील तसेच महापालिकेतील महिला व पुरुष अग्निशमन कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी आयुक्त मंगेश चितळे यांनी शहीद अग्निशमन जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. या सप्ताहाच्या दरम्यान नागरिकांमध्ये आग आणि आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच, निवासी, व्यापारी, शैक्षणिक इमारती व गृह निर्माण संस्थांमध्ये अग्निसुरक्षेबाबत मार्गदर्शन, ड्रील्स आणि प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या सप्ताहाचा समारोप २० एप्रिल रोजी मुंबई येथे मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रमाने होणार आहे. त्याचबरोबर पनवेल शहरातील विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम, प्रात्यक्षिके आणि विद्यार्थ्यांसाठी माहितीपर सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
नागरिकांमध्ये सुरक्षिततेविषयी सजगता निर्माण करण्याच्या उद्देशाने हे अभियान पनवेल महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे प्रभावीपणे राबविले जाणार आहे.