आंतरराष्ट्रीय फुटबॉल मॅचनंतर डी.वाय.पाटील स्टेडिअम बाहेरील परिसराच्या तत्पर स्वच्छतेबद्दल नागरिकांकडून समाधान
नेरूळ येथील डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये रविवारी संपन्न झालेल्या लिजेन्ड्स ई आय क्लासिको या सामान्याला हजारो क्रीडाप्रेमींची उपस्थिती असणार हे लक्षात घेत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्टेडियम बाहेरील रस्ते व परिसर स्वच्छतेचे पूर्वनियोजन केले होते.
त्यास अनुसरून अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ 1 उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांनी त्याठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वच्छता कार्यावर नियंत्रण ठेवले आणि नेरूळ विभागाचे स्वच्छता अधिकारी श्री.अरुण पाटील व स्वच्छता निरीक्षक श्री.मिलिंद आंबेकर, श्री.नवनाथ ठोंबरे, श्री.भूषण सुतार यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सर्व पर्यवेक्षक, स्वच्छता दूत आणि कचरा वाहतूक पर्यवेक्षक, मॅनेजर व कचरा वाहतुकीचे सर्व स्वच्छता दूत यांच्या माध्यमातून डी वाय पाटील स्टेडियम बाहेरील रस्ते व परिसर स्वच्छ केला. परिमंडळ 1 उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे तसेच नेरूळ विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री जयंत जावडेकर यांचेही याकामी योगदान लाभले.
सामन्यानंतर रात्री 11 पासून पहाटे 3 वाजेपर्यंत ही विशेष साफसफाई मोहीम राबविण्यात आली. यामध्ये 40 हून अधिक स्वच्छताकर्मी सहभागी होते. या परिसरात पडलेला 1.5 टन कचरा संकलित करून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी लगेच वाहून नेण्यात आला. यामध्ये प्लास्टिक बॉटल्स तसेच सुक्या कच-याचे प्रमाण मोठे होते. एवढा मोठा इव्हेन्ट होऊनही पहाटेच मॉर्नींग वॉकला बाहेर पडणा-या नागरिकांनी परिसर स्वच्छ पाहून समाधान व्यक्त केले.