झाडांवर खिळे ठोकणे किंवा विद्युत रोषणाई करणा-या वृक्षांस इजा पोहचविणा-या व्यक्ती,संस्था व व्यावसायिकांवर होणार दंडात्मक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वृक्षांवर खिळे ठोकून जाहिराती करण्यात येत असल्याचे तसेच काही वृक्षांवर विद्युत रोषणाई करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. वृक्षांवर खिळे ठोकणे व विद्युत रोषणाई यामुळे वृक्षांना धोका निर्माण होत असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वृक्षराजीवर परिणाम होऊन पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने दि. 27 जानेवारी 2025 रोजीचा ठराव क्र.7461 अन्वये वृक्षांवर खिळे ठोकणे, विद्युत रोषणाई करणे व वृक्षास इजा पोहचविणाऱ्या व्यक्ती, संस्था, व्यावसायिक यांचेवर दंडात्मक कारवाई करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अशा नागरिक /संस्था / व्यावसायिक यांचेकडून प्रतिवृक्ष रुपये 10,000/- इतका दंड आकारणेबाबत सहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी यांचेमार्फत कारवाई करण्यात येणार आहे.
अशा प्रकारच्या कारवाईमुळे वृक्षांवर खिळे ठोकणे व विद्युत रोषणाई करून पर्यावरणास बाधक ठरणा-या गैरप्रकारांना प्रतिबंध होईल तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वृक्षांचे व पर्यावरणाचे रक्षण होईल. तरी नागरिकांनी नवी मुंबई शहराच्या पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.