बाहेरगावी जाताना सावधगिरी बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन
पनवेल दि. ०८ (वार्ताहर) : मे महिना म्हणजे चोरट्यांचा सुगीचा काळ. या कालावधीत बहुतेक कुटुंब आपल्या मुळ गावी अथवा बाहेरगावी फिरण्यासाठी जात असतात. नेमकी हीच संधी साधून चोरटे अशी घरी हेरून ते पूर्णपणे साफ करतात. या सुट्टीच्या हंगामात चोरट्यांचा सुळसुळाट वाढून चोरी, घरफोडी सारख्या घटना घडत असल्याने नागरिकांनी सुट्टीच्या हंगामात बाहेरगावी जाताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. उन्हाळयाच्या सुट्टीत बहुतेक नागरिक सहकुटुंब आपल्या मुळ गावी किंवा बाहेरगावी जातात, या सुट्टीच्या कालावधीत बंद घर म्हणजे चोरट्यांचा रान मोकळे असते. त्यामुळे मे महिन्यात घरफोडी-चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. घरफोड्या करणाऱ्या अनेक टोळ्या या सुट्टीच्या काळात परराज्यातून येऊन पनवेल व परिसरात तळ ठोकून असतात, ते यापूर्वीच्या घटनांवरुन दिसून आले आहे. अनेकदा घरफोडी करणाऱ्यांमध्ये परराज्यातील टोळीचा समावेश असल्याचे तसेच या टोळया बंद घरांचा माग काढ़त, घरफोड्या करत असल्याचे आढळून आले आहे.
घरामध्ये चोरी होऊ नये यासाठी बाहेरगावी जाण्यापूर्वी नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी, याबाबत पोलिसांकडून प्रत्येक वर्षी नागरिकांना महत्वाच्या सूचना दिल्या जातात, मात्र, नागरिक पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून बिनधास्त बाहेरगावी निघून जातात. परिणामी, चोरटे त्यांचे संपूर्ण घर साफ करुन पसार होतात. मात्र, चोरी झाल्यानंतर पोलिसांना लक्ष्य केले जाते. त्यामुळे चोरी होऊ नये यासाठी नागरिकांनी देखील आधी स्वतः काळजी घेणे, दक्ष राहणे आणि बाहेर जाताना त्याची माहिती पोलिसांना देणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
गावी अथवा बाहेरगावी जाताना घर नीट बंद करा. तसेच आपण बाहेर जात असल्याची कल्पना शेजाऱ्यांना द्या. जास्त काळ बाहेरगावी जायचे असल्यास आपल्या घरात जास्त पैसे, सोन्याचे दागिने ठेवू नये, गावाला जाण्याबाबत तसेच परत येण्याबाबतची माहिती परिसरातील पोलीस स्टेशनला द्यावी, बाहेर जाताना कपाटाच्या चाव्या सोबत घेऊन जावे. तसेच मौल्यवान वस्तू घरात न ठेवता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत. घरात नोकर ठेवताना, नोकराचे संपूर्ण नाव, गाव, वय, राहण्याचा पत्ता आणि संपर्क क्रमांक घेऊन ठेवावेत. नोकराचे मूळ राहण्याचे ठिकाण तसेच कुटुंबियांची माहिती घ्यावी, अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत.
त्याचप्रमाणे नोकरास ओळखणाऱ्या परिसरातील दोघांची नावे, पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक, नोकराचा पासपोर्ट फोटो तसेच शक्य झाल्यास त्याच्या बोटाचे ठसे घेऊन ठेवावेत. नोकरासमोर आपल्या संपतीचे प्रदर्शन करु नये. नोकर घरात नसताना मौल्यवान वस्तू तसेच पैसे कपाटात ठेवावेत. कपाटांच्या चाव्या नोकराच्या हाती लागणार नाही, याची काळजी घ्यावी. रात्री झोपताना घराची दारे, खिडक्या, कंपाऊंडचे गेट व्यवस्थित बंद असल्याची खात्री करावी, शेजाऱ्यांना आपले फोन नंबर, कार्यालयाचा पत्ता, जवळच्या नातेवाईकांचा पत्ता, आदि आवश्यक असणारी माहिती देऊन ठेवण्याबाबत देखील सूचना पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत.
बहुतेक नागरिक बाहेरगावी फिरण्यासाठी गेल्यानंतर फेसबुक, इन्स्टाग्राम सारख्या सोशल मिडीयावर आपले फोटो टाकत असतात. सध्या चोरटे देखील सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याने बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांची माहिती चोरटे सोशल मिडीयावरून मिळवितात, त्यानंतर बंद असलेले त्यांचे घर साफ करतात. चोरट्यांनी सोशल मिडीयावरुन अशा प्रकारे माहिती मिळवून अनेक घरफोड्या केल्याचे प्रकार यापूर्वी उपडकीस आले आहेत. त्यामुळे बाहेरगावी गेलेल्या नागरिकांनी आपले फोटो, व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याबाबत पोलिसांकडून जनजागृती देखील करण्यात येत आहे.