कार्यकर्त्यांच्या आग्रहात्सव जनतेच्या हितासाठी करणार भाजमध्ये प्रवेश- माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे
पनवेल दि.०५(प्रतिनिधी): आज पनवेल, उरण व खालापूर विभागातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पनवेल मधील कार्यालयात घेतली असता सर्व एक मुखाने मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आग्रह धरल्याने व या संदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याशी चर्चा केल्यावरच भाजपमध्ये प्रवेश करण्याचे आम्ही निश्चित केले असून येत्या ७ मे रोजी स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही आमच्या सर्व समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश करत असल्याची घोषणा माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांनी सोमवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली.
विधानसभा निवडणुकीनंतर शेकापक्षाच्या आडमुठे धोरणावर पक्षाचे जेष्ठ नेते व आर्थिक बाजू भक्कमपणे सांभाळणारे उद्योजक जे. एम. म्हात्रे उर्फ भाऊ यांनी सोमवारी तातडीने बोलावलेल्या समर्थक, कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर असंख्य समर्थकांनी पुढील राजकारणात मुख्य प्रवाहासोबत जाण्याचा मनोदय व्यक्त केला. पर्यायाने भाजपमध्येच जावे, असा आग्रह सर्वच समर्थकांनी केल्यामुळे अखेर जे. एम. म्हात्रे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याशी चर्चा केल्यानंतर भाजप प्रवेशाची तारीख व वेळ जे एम म्हात्रे यांनी जाहीर केली. गेले काही दिवस शेतकरी कामगार पक्षाच्या धेय्य -धोरणावर जे. एम. म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली. आपल्याला अपेक्षित असलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळत नसल्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात त्यांनी घेतला होता. रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी आपण अजूनही शेकापमध्ये असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर सोमवारी तातडीने आपल्या समर्थकांची बैठक पनवेल येथील गुरुशरनम कार्यालयात बोलावली. या बैठकीला शेकापचे अनेक मान्यवर आणि पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. यावेळी सुद्धा जे एम म्हात्रे यांनी आपली भूमिका जाहीर करून उपस्थितांकडून त्यांची मते जाणून घेतली असता त्यांनी सुद्धा भाजपमध्ये जाण्यास समर्थन दिल्याने आज आम्ही भाजपात जात असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस गणेश कडू, माजी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, कार्यालयीन चिटणीस जितेंद्र म्हात्रे, माजी नगराध्यक्ष अनुराधा ठोकळ, माजी नगरसेवक सुनील बहिरा, रवींद्र भगत, प्रीती जॉर्ज-म्हात्रे, पुष्पलता मढवी,सारिका म्हात्रे, सुरेखा मोहोकर, उद्योगपती हरिश्चन्द्रसिंघ सग्गु, माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, विलास मोहकर, युवानेते जॉर्ज, एल.टी. पाटील, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी बोलताना जे.एम. म्हात्रे यांनी सांगितले की, माझ्या सोबत प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये योग्य तो न्याय व मानसन्मान मिळेल अशी ग्वाही जे.एम .म्हात्रे यांनी दिली तर प्रीतम म्हात्रे म्हणाले की, नागरी प्रश्ना सोडवण्यासाठी आम्ही आग्रही होतो व आता सुद्धा पाठपुरावा करून हे प्रश्न सोडवू व कोणत्याही अपेक्षेने व पदाच्या लालसेने आम्ही भाजप मध्ये प्रवेश करत नसल्याचे सांगितले. तसेच गणेश कडू यांनीसुद्धा आपल्या भावना व्यक्त करत असताना शेकाप सोडताना मनाला वेदना होत असल्याची भावना व्यक्त केली.